मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी
बेळगाव : राज्य सरकार इतके भ्रष्ट झाले की कमिशनवर चालले आहे. राज्य सरकारकडून गोरगरिबांना घरे बांधण्यासाठी निधी देऊन त्यांना निवारा देण्यात येतो. मात्र गृहनिर्माण मंत्र्यांनी घरे वाटपात भ्रष्टाचार करून आपल्याच मर्जीतील लोकांना दिली आहेत. याच्या निषेधार्थ राज्य भाजपच्यावतीने राज्यभरात निदर्शने करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर बेळगाव शहर भाजपच्यावतीनेही शुक्रवारी राणी चन्नम्मा सर्कलमध्ये निदर्शने करण्यात आली. यानंतर जि. पं. कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच राज्य सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. याप्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याने तणावाचे वातारवण निर्माण झाले होते. यामुळे पोलिसांकडून कार्यकर्त्यांनी ताब्यात घेण्यात आले. यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. राज्यातील काँग्रेस सरकारकडे विकासकामे व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी पैसे नाहीत. त्यांच्या पंचहमी योजनेचाही बोजवारा उडत आहे. यामुळे सरकार कमिशनवर काम करत असून विविध विभागांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे राज्य भाजपच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. त्यानुसार प्रारंभी राणी चन्नम्मा सर्कलमधील कन्नड भवन आवरात एकत्र येऊन शहर भाजप कार्यकर्त्यांनी राणी चन्नम्मा सर्कलमध्ये निदर्शने केली. यानंतर आपला मोर्चा जि. पं. कार्यालकडे वळविला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
घोषणाबाजी करत कार्यकर्ते जि. पं. कार्यालयाकडे गेले. यावेळी संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांकडून कार्यालयाचे गेट बंद करण्यात आले. यामुळे भाजप नेते व कार्यकर्त्यांनी कार्यालसमोरच ठिय्या मांडला. यावेळी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यातच पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याने पोलिसांनी आंदोलनाची परिस्थिती हाताळण्यासाठी कार्यर्त्यांना ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना आपल्या वाहनातून घेऊन जाण्यात आले. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली. यावेळी डॉ. सोनाली सरनोबत, सुभाष पाटील, गीता सुतार, मुरगेंद्रगौडा पाटील, संदीप देशपांडे, प्रसाद देवरमनी यांच्यासह भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.









