शेतकऱ्यांची चिंता किंचित कमी : तरीही थोड्या पिकांना फटका बसण्याची शक्यता
वार्ताहर/येळ्ळूर
आठवडाभर सुरू असणाऱ्या धुवांधार पावसाने गेले दोन दिवस थोडी विश्रांती घेतल्यामुळे येळ्ळूरसह सुळगा, हट्टी, धामणे, राजहंसगड आदी गावातील शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. कोवळी पिके पाण्याखालीच राहून कुजतात काय? अशा भीतीखाली वावरणाऱ्या शेतकऱ्याची पाण्याचा निचरा होऊन पिके पाण्याबाहेर असल्यामुळे चिंता कमी झाली आहे. यापूर्वी पेरणीपूर्वीपासूनच बसलेल्या पावसाच्या तडाख्याने शेतकरीवर्ग हैराण झाला होता. कशीबशी पेरणी झाली आणि पुन्हा पावसाने आपले रूप दाखवायला सुरुवात केल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला. पिकाची उगवण होते न होते तोच शिवारात पावसाने पाणी पाणी केले. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवते की काय? अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. पण निसर्गाने साथ दिल्याने दिलासा दिला. कमी झालेल्या पावसामुळे व उघडझाप सुरू झाल्याने शिवारातील पाण्याचा निचरा होऊन पिके पाण्याबाहेर आली. पण थोड्या प्रमाणात पिकांना पाण्याचा तडाखा बसलाच. प्रामुख्याने भात पिकापेक्षा बटाटा, सोयाबिन, भुईमूग पिकासह भाजीपाला पिकाचे नुकसान जास्त झाले आहे. त्यामुळे पावसाने आता विश्रांती घ्यावी आणि शेतकरी वर्गाला आपली कामे करण्यास वेळ द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहे.









