रत्नागिरी :
येथील मिरकरवाडा बंदराला उधाणाच्या भरतीने शुक्रवारी तडाखा दिला. बंदरातील मच्छीमार नौकांच्या संरक्षणासाठी ब्रेकवॉटर वॉल असतानाही त्यावरून उसळणाऱ्या लाटांचे पाणी प्रथमच थेट बंदरातील जेटीच्या काठापर्यंत चढले होते. शाकारून ठेवलेले ट्रॉलर्स लाटांच्या तडाख्याने एकमेकांवर जोरदार आदळून अनेक नौकांचे मोठे नुकसान झाले.
गेल्या चार दिवसांपासून समुद्राला मोठे उधाण आले आहे. त्यामुळे किनारपट्टीवर अजस्त्र लाटांचे तांडव पहायला मिळत आहे. उसळणाऱ्या प्रचंड वेगाच्या लाटा येथील किनाऱ्याला येऊन आदळत आहेत. त्याचा तडाखा ठिकठिकाणी बसला आहे. पावसाळी मासेमारी बंदीमुळे मिरकरवाडा बंदरात सुमारे 350 नौका वेगवेगळ्dया जेटींवर शाकारून ठेवण्यात आल्या आहेत. मात्र शुक्रवारी आलेल्या समुद्राच्या उधाणामुळे उसळलेल्या लाटा या बंदराकडे जोरदार घुसल्या. प्रथमच या बंदराचा संरक्षक बंधारा पार करून लाटांचा तडाखा बंदरातील मच्छीमार नौकांना बसला. त्यामुळे येथील मच्छीमारांचीही बंदरावर मोठी धावपळ उडाली.
या मोठ्या भरतीमुळे समुद्राचे पाणी बंदरातील जेटींच्या अगदी काठोकाठ भरले होते. त्यामुळे बंदरातील नौकाही अगदी पाण्याबरोबर वर आल्या होत्या. बंदराकडे लाटांचा जोरदार तडाखा राहिल्याने दाटीवाटीने शाकारून ठेवलेल्या मच्छीमार नौका पाण्याच्या हेलकाव्याने एकमेकांवर जोरदार आदळत होत्या. त्यात अनेक नौकांचे मोठे नुकसान झाले. नौकांचे काठ व त्या खालचे भाग एकमेकांवर आदळल्याने हे नुकसान झाल्याचे येथील मच्छीमार सुहेल साखरकर यांनी सांगितले.








