बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थ विरोधी दिनानिमित्त अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाविषयी जागृती करण्यात आली. जिल्हा कायदा सेवा प्राधिकारण, केएलई नर्सिंग कॉलेज व मध्यवर्ती कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे कायदा सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव न्यायाधीश संदीप पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून केएलई नर्सिंग कॉलेजच्या सहप्राध्यापक संगनगौडर, जिल्हा मानसिक आरोग्य अधिकारी गीता कांबळे आदी उपस्थित होते. प्रभारी मुख्य अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात साहाय्यक अधीक्षक बी. एस. पुजारी, मल्लिकार्जुन कोण्णूर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय डुमगोळ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना न्यायाधीश संदीप पाटील म्हणाले, जन्मताच कोणी व्यसनी नसतो. इतरांचे अनुकरण किंवा दबावाला बळी पडून हळुहळू माणूस व्यसनाधीन बनतो. आधुनिक युगात अनेक जण व्यसनांच्या आहारी जात आहेत. याला वयाचेही बंधने नाहीत. व्यसनाधीनतेमुळे युवा पिढी कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने त्रस्त होऊन आपले जीवन उद्ध्वस्त करून घेत आहेत. अंमली पदार्थांचे दुष्परिणाम जाणून घेऊन त्याचे सेवन बंद करावे. योग, ध्यान, प्राणायमासारखे उत्तम सोयी लावून घ्याव्यात. यावेळी डॉ. सरस्वती, डॉ. शालदार, जेलर राजेश, बसवराज, रमेश उपस्थित होते. शशिकांत यादगुडे यांनी स्वागत केले. संध्या यांनी आभार मानले.









