गोविंद शर्मा खजिनदारपदी, तर अश्विनी पाटील यांची सदस्यपदी बिनविरोध : अध्यक्षपदी दिल्लीचे सुधांशू मित्तल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय खो-खो महासंघाची 2025 ते 2029 या कार्यकालासाठीची निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत महाराष्ट्राने मोठी घोडदौड करत, महासंघाच्या खजिनदारपदाची तिजोरी आपल्या हाती घेतली आहे. अध्यक्षपदी दिल्लीचे सुधांशू मित्तल तर महासचिवपदी पंजाबचे उपकार सिंह विर्क यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्र खो-खो संघटनेचे खजिनदार अॅङ गोविंद शर्मा यांची भारतीय खोखो महासंघाच्या खजिनदारपदी बिनविरोध निवड झाली. याचवेळी, महाराष्ट्र खोखो असोसिएशनच्या उपाध्यक्षा अश्विनी पाटील याही सदस्यपदी बिनविरोध निवडून आल्या. गेल्या दोन ते तीन कार्यकालानंतर महाराष्ट्राला पुन्हा एकदा महासंघाचे खजिनदारपद मिळाले आहे. याआधीही गोविंद शर्मा यांनी भारतीय खोखो महासंघाच्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेसाठी (13 ते 19 जानेवारी 2025) भारतीय संघाच्या निवड समिती सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या नेतृत्वात ही स्पर्धा इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम, नवी दिल्ली येथे यशस्वीरित्या पार पडली.









