वृत्तसंस्था./ नवी दिल्ली
परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी शुक्रवारी इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरघची यांच्याशी चर्चा केली. इराणमधील सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती घेण्यासोबतच भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात मदत केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली. त्यांच्या संभाषणात इराणमधील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाली.
इराण आणि इस्रायलमधील अनेक दिवसांच्या संघर्षादरम्यान भारताने ‘ऑपरेशन सिंधू’ राबवत दोन्ही देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यात आले. ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून 173 भारतीयांना घेऊन जाणारे एक विशेष विमान गुरुवारी रात्री उशिरा आर्मेनियातील येरेवन येथून नवी दिल्लीला पोहोचले. ही माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये आतापर्यंत 19 विशेष विमानांमधून एकूण 4,415 भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याचे स्पष्ट केले. इराणमध्ये भारतीय समुदायाचे सुमारे 10,000 लोक आणि इस्रायलमध्ये सुमारे 40,000 भारतीय नागरिक आहेत.
भारताने केले इराणचे कौतुक
‘आज दुपारी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची यांच्याशी बोललो. इराणमधील सध्याच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत त्यांचे विचार आणि मत मांडल्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो. भारतीय नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर सुलभ केल्याबद्दल त्यांचे आभार.’ असे डॉ. जयशंकर यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. इराणमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी भारत सरकार सतत प्रयत्न करत आहे.









