► वृत्तसंस्था / तेहरान
इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरुन इराणमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सहस्रावधी नागरिकांची धरपकड करण्यात आली असून अनेकांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. इस्रायलने इराणचा अणुबाँब निर्मिती कार्यक्रम पुढे चालविणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांची हत्या हेरगिरीच्या माध्यमातून केली होती. इस्रायलला या शास्त्रज्ञांच्या हालचालींची आणि ठावठिकाण्यासंबंधीची नेमकी माहिती इराणमधील अनेकांनी पुरविली होती, असा तेथील प्रशासनाचा संशय आहे.
इस्रायलची गुप्तचर संस्था मोस्सादने इराणच्या सेनेतही प्रवेश मिळविला आहे. इराणच्या सुरक्षा व्यवस्थेला आतून पोखरण्याचे काम इस्रायली गुप्तहेर करीत आहेत. मोस्सादच्या माध्यमातून इस्रायलने इराणचे गुप्त अणुतळ, अणुशास्त्रज्ञ आणि अणुतंत्रज्ञ यांची अचूक माहिती मिळविली आणि या शास्त्रज्ञांची तसेच तंत्रज्ञांची हत्या केली. इस्रायलने इराणच्या विरोधात ‘रायजिंग लॉयन’ हे अभियान चालविले होते. या अभियानाच्या माध्यमातून इराणची लष्करी आस्थापने, शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याची कोठारे, तसेच महत्वाच्या अणुप्रक्रिया केंद्रांवर हल्ले चढविले होते. इराणची तेलशुद्धीकरण केंद्रेही इस्रायलने लक्ष्य केली होती. इस्रायलला याकामी साहाय्य गुप्तपणे इराणच्याच नागरीकांनी केले होते, असा संशय इराणच्या प्रशासनाला आहे. त्यापोटी या प्रशासनाने अनेक संशयितांना चौकशी न करताच मृत्यूदंड दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमेरिकेनेही काही दिवसांपूर्वी इराणच्या अणुप्रक्रिया तळांवर भीषण हल्ला चढविला होता. या हल्ल्यात इराणचे महत्वाचे अणुतळ उद्ध्वस्त झाल्याचे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. अमेरिकेलाही इराणमधील गुप्त माहिती मोस्सादनेच पुरविली होती, असे बोलले जात आहे. त्यामुळे इराणचे धर्मांध प्रशासन चिंतेत पडले आहे. हेरगिरीपासून इराणला मुक्त करण्यासाठी आता या प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. मात्र, यात अनेक निरपराध नागरिकांचा बळी केवळ संशयाच्या आधारावर घेतला जात आहे, अशी टीकाही होत आहे.
विदेशी हेरसंस्थांविरोधात आघाडी
इराणच्या प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेची सीआयए, इस्रायलची मोस्साद आणि एमआय 6 या हेरगिरी संस्थांच्या विरोधात आघाडी उघडल्याचे वृत्त आहे. इराणचे अनेक नागरिक या संस्थांसाठी गुप्तपणे काम करतात. त्यांना शोधण्याचे काम इराणच्या गुप्तचर संस्थेने हाती घेतले आहे. तथापि, इस्रायलच्या गुप्तचर संस्थांनी इराणमध्ये इतक्या खोलवर मुसंडी मारलेली आहे, की इराणला हेरगिरीमुक्त करण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करावे लागतील. तसेच इतके करुनही तो देश पूर्णत: हेरगिरीमुक्त होण्याची शक्यता नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.









