घटनेसंबंधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघनेत्याची मागणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून (प्रिअँबल) धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे दोन शब्द काढून टाकावेत, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महासचिव दत्तात्रेय होसबाळे यांनी केली आहे. त्यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात ही मागणी केली. त्यांनी देशावर आणीबाणी लादण्यासाठी काँग्रेसवरही टीका केली.
पन्नास वर्षांपूर्वी 25 जून 1975 या दिवशी तत्कालीन नेत्या इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली. त्या दिवसापासून 21 मार्च 1977 पर्यंत देशात लोकशाही, विचारस्वातंत्र्य आणि अन्य मूलभूत अधिकार गुंडाळून ठेवण्यात आले होते. लोकांना नागरी स्वातंत्र्य नाकारण्यात आले होते. वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य आणि विरोधी पक्ष यांची गळचेपी करण्यात आली होती. तो काळ सर्वसामान्यांसाठी अत्यंत क्लेषदायक असाच होता, असे प्रतिपादन त्यांनी केले.
ते शब्द आज संदर्भहीन
आणीबाणीच्या काळातच घटनेच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शब्द घालण्यात आले होते. आज देशाची धोरणे परिवर्तीत झाली आहेत. त्यामुळे आणीबाणीच्या काळात घातलेले ते शब्द आज संदर्भहीन झाले आहेत. ते घटनेतून काढून टाकून आणीबाणीची ती आठवणी पुसली जावी, अशा अर्थाचे वक्तव्य त्यांनी या कार्यक्रमात केले. देशावर आणीबाणी लादून नागरीकांच्या अधिकारांचे हनन केल्यासाठी काँग्रेसने देशाची क्षमायाचना करावी, अशी सूचना त्यांनी केली.
लालू यादव यांची टीका
दत्तात्रेय होसबाळे यांच्या घटनेसंबंधीच्या सूचनेवर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी टीका केली आहे. घटनेच्या प्रस्तावनेत किंवा अन्यत्र कोणतेही परिवर्तन आपला पक्ष खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अशी मागणी करुन आपली फॅसिस्ट मनोवृत्ती दाखवून दिली आहे, असा आरोपही त्यांनी पाटणा येथे बोलताना केला.
संविधान हत्या दिन
आणीबाणीचा कालावधी देशाच्या इतिहासातला काळा अध्याय होता. या कालखंडाचा निषेध करण्यासाठी 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून पाळण्याचा निर्णय केंद्रातील सरकारने 2023 पासून घेतला आहे. या दिवशी सत्ताधारी आघाडीच्या वतीने देशभरात आणीबाणीच्या निषेधार्थ कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच दिनाचे निमित्त साधून होसबाळे यांनी घटनेच्या प्रस्तावनेतून हे दोन शब्द काढण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.









