सातारा :
मराठीतील अभिनेते, कलाकार या सगळयांचा विरोध आहे. पण माझ्या मते प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदीची सक्ती करु नये. पाचवीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही. देशातील एक वर्ग हिंदी भाषा बोलतो हे जरी खरे असले तरीही मुलांना एका वयात किती भाषांचा लोड टाकायचा, हे सरकारला कळले पाहिजे. त्यामुळे मातृभाषा बाजुला पडली तर योग्य नाही. त्यासाठी सरकारने योग्य पर्याय शोधावा, ठाकरे बंधू बोलतात ते काही चुकीचे नाही. मराठी भाषेसाठी एकत्र येतात ही चांगली गोष्ट आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी मराठी भाषेची पाठराखण करत हिंदीच्या सक्तीला विरोध आहे, हे स्पष्ट केले. दरम्यान, त्यांनी इतर मुद्यावरही उहापोह केला.
साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानिमित्ताने ते आले होते. ते कार्यक्रम झाल्यानंतर हॉटेल प्रिती येथे शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सुरुवातीला साताऱ्यात येण्याचे कारण सांगताना ते म्हणाले, महाराष्ट्रात आता एआय तंत्रज्ञान शेतीत सुद्धा वापरले जात आहे. एआयच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पादन घेता येवू शकते. त्यामुळे विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, उद्योजक असतील या सगळ्यांनी एआयच्या बाबत विचार केला पाहिजे. आनंदाची गोष्ट आहे. रयत शिक्षण संस्थेसाठी एका संस्थेने एआयबाबत पुढाकार घेतला आहे. त्याचा उपयोग निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
हिंदी सक्तीच्या विरोधाबाबत पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, जे हिंदी भाषेला विरोध करत आहेत. त्याच अनुषंगाने माझ्या मते या सगळ्यांचा आग्रह जो आहे. तो म्हणजे प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी सक्तीचे करु नये. पाचवीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही. देशाचा एक वर्ग हिंदी भाषा बोलतो. हे जरी खर असले तरी मुलांच्या एका वयात किती भाषांचा लोड टाकावा हे सरकारने ओळखले पाहिजे. अन्य भाषांचा लोड विद्यार्थ्यांवर टाकल्यास मातृभाषा बाजुला पडेल, ते योग्य नाही. पाचवी पर्यंत हिंदी भाषा नको यासाठी सरकारने पर्याय शोधावा. पाचवीनंतर त्या मुलाच्या कुटुंबाचे लोक कोणती भाषा शिकायची हा निर्णय घेतील, त्याला आमचा विरोध नाही. ठाकरे बंधूंचे स्टेटमेंट मी बघितले आहे. ते चुकीचे बोलले नाहीत. त्या निमित्ताने महाराष्ट्रातील मराठी भाषीक एकत्र येत आहेत. मातृभाषेच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे, असे सांगत त्यांनी मराठी भाषेबाबत त्यांनी आपले मत व्यक्त केले. पुढे त्यांना 6 तारखेच्या मोर्चाबाबत प्रश्न केल्यावर ते म्हणाले, तुम्ही आताच सांगताय याबाबत. आम्हाला कोणी सांगितले नाही. कोणी एकटा पक्ष याचा निर्णय घेवू शकत नाही. आमचा अॅप्रोच निगेटीव्ह नाही, असे त्यांनी उत्तर दिले.
- भास्कर जाधव तत्व सोडणार नाहीत
भास्कर जाधव हे नाराज असल्याचा प्रश्न केल्यावर ते म्हणाले, भास्कर जाधव हे विचाराने स्पष्टता असणारे व्यक्तीमत्व आहे. एखाद्या गोष्टीची नाराजी असते. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचे काम प्रभावी आहे. ते तत्व कधी सोडणार नाहीत. ते एखाद्या गोष्टीवर रागवले असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
- इराणबाबत भारताची भूमिका अनुकूल होती
इराण, इस्त्राईल युद्धाबाबत छेडले असता ते म्हणाले, इराणवर हल्ल्याची सुरुवात इस्त्राईलने केली. इराणला भारताने दुखावणे हे योग्य नाही. आतापर्यंत भारताची जी नेतृत्व होवून गेली त्यामध्ये इंदिरा गांधी असतील, पंडीत नेहरु असतील, मनमोहन सिंग असतील अशा सर्व नेतृत्वांनी इराणच्या बाबत सामंजस्याची भूमिका घेतली होती. इस्त्राईल शेतीच्या क्षेत्रात अग्रेसर आहे. एखादा छोटा देश मोठ्या देशावर हल्ला करतो. ही गोष्ट योग्य नाही. आतापर्यंत भारताची इराणला अनुकूल भूमिका होती. आताही भारताला स्वच्छ अशी भूमिका घ्यावी लागेल, असे उत्तर दिले.
- आणीबाणीच्या मुद्यावरुन भाजपावर टीका
आणीबाणीचा प्रश्न छेडला असता ते म्हणाले, त्या काळात आणीबाणीबाबत लोकांची प्रतिक्रिया तीव्र होती. इंदिरा गांधींनी त्यावेळी देशातल्या जनतेची जाहीर माफी मागितली होती. तरीही पुन्हा तोच मुद्दा उकरुन काढणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. ज्या इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली होती. त्याचदरम्यान, काँग्रेसचा पराभव झाला असला तरीही एक वर्षानी जनतेने पुन्हा त्यांच्याकडे नेतृत्व सोपवले होते. हे दुर्लक्ष करुन चालणार नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली.
- फडणवीस यांची आम्हाला खूप भीती…!
पत्रकारांनी सर्व प्रश्न त्यांच्या अँगलने विचारले. त्यात शक्तिपिठ महामार्ग प्रश्नी ते म्हणाले, मी सरकारकडून माहिती घेतोय. माहिती घेतल्यानंतर बोलणार आहे, सरकारने माहिती घेण्याची तयारी दर्शवली आहे, असे त्यांनी सांगताच, पत्रकारांनी पुन्हा त्यांना प्रश्न केला की फडणवीस यांनी या प्रकरणावरुन धमकी दिली आहे, त्यावर शरद पवार म्हणाले, फडणवीस यांची आम्हाला खूप भीती आहे. आमची झोप उडवली फडणवीस यांच्या धमकीमुळे, त्यामुळे आता कसा करायचे तुम्ही बघा, असे उत्तर दिले. पुढे माळेगाव कारखान्याच्या विजयावर ते म्हणाले, अगोदर ही माळेगावचा कारखाना त्यांच्याच हातात होता. त्यामध्ये काही वेगळे चित्र नाही. तसेच आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने 30 तारखेला महाविकास आघाडीची बैठक होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
..








