विविध ठिकाणी साचलेले पाणी ओसरण्यास सुरुवात
बेळगाव : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरला आहे. बुधवारी रात्रीपासून पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली असून गुरुवारी सकाळपासून पाऊस गायब झाला. दुपारी काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली. एकंदरीत चार दिवसांनंतर पावसाने उघडीप दिल्याने जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली आहे. खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी दिसून आली. त्याचबरोबर शिवार आणि रस्त्यावरील पाणीदेखील ओसरण्यास मदत झाली. शाळांना दोन दिवस सुटी देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनीदेखील सुटीचा आनंद लुटला. आर्द्रा नक्षत्राने सुरुवातीलाच जोरदार सलामी दिल्याने जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. पावसाची संततधार कायम राहिल्याने सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली. सध्या जिल्ह्यातील 18 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे बहुतांश गावांचा संपर्क तुटला आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीची चिंता सतावत आहे. शिवारात शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. संततधार पावसामुळे जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले होते. मात्र बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर ओसरल्याने दिलासा मिळाला आहे. गुरुवारी सकाळपासूनही पावसाने उघडीप दिली. दुपारी पावसाचा शिडकावा झाल्यानंतर सायंकाळपर्यंत उघडीप कायम होती. त्यामुळे बाजारपेठेत ओसरलेली गर्दी पुन्हा गुरुवारी वाढल्याचे दिसून आले. खरेदीसाठी गर्दी झाल्याने सर्व व्यवहार पूर्वपदावर आले आहेत.सततच्या पावसामुळे शेतीसह रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. पाण्यातूनच वाहनचालकांना ये-जा करण्याची वेळ आल्याने प्रशासनाच्यावतीने ठिकठिकाणी जेसीबी लावून पाणी वाहून जाण्यास वाट करून देण्यात आली. वारा व पावसामुळे विविध ठिकाणी झाडांची पडझड होत होती. मात्र गुरुवारी कोठेही झाडे कोसळल्याचे वृत्त नाही. दिवसभर पावसाने उसंत घेतल्याने शिवारातील पाणी ओसरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
रस्ते, नाले स्वच्छतेचे प्रश्न तातडीने मार्गी लावा,महापौर, मनपा आयुक्तांची अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना
पावसामुळे शहरातील विविध रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याचबरोबर नाला सफाई आणि स्वच्छता करण्यात यावी, अशी सूचना गुरुवारी मनपा आयुक्त शुभा बी., महापौर मंगेश पवार यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना केली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त, महापौर, उपमहापौर आणि नगरसेवक विविध ठिकाणी भेटी देऊन समस्या जाणून घेत आहेत. गुरुवारी गुडस्शेड रोड, आरपीडी, गजानन महाराजनगर, उद्यमबाग आदी ठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबल्याने रस्ते खराब झाले आहेत. त्याचबरोबर काही नाल्यांच्या ठिकाणी अडथळे असल्याने पाणी वाहून जाणे अवघड जात आहे. तसेच अस्वच्छता पसरली असल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्व समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, अशी सूचना यावेळी अधिकारी व लोकप्रतिनिधींनी मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना केली.









