1 जुलैपासून हुबळी-पंढरपूर एक्स्प्रेस : आषाढी एकादशीनिमित्ताने भाविकांची होणार सोय
बेळगाव : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी नैर्त्रुत्य रेल्वेच्यावतीने हुबळी-पंढरपूर विशेष रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. या एक्स्प्रेसमुळे खानापूर, बेळगाव, तसेच जिल्ह्यातील इतर भाविकांना पंढरपूरला ये-जा करणे सोयीचे होणार आहे. दि. 1 ते 8 जुलै (4 जुलै वगळता) एक्स्प्रेस धावणार असल्याने वारकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरपूर येथे दर्शनासाठी जात असतात. बेळगाव, हुबळी, खानापूर, चिकोडी, रायबाग, अथणी या परिसरातील भाविकांना ये-जा करण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी करण्यात आली होती. सध्या बेळगावमधून पंढरपूरला थेट रेल्वेसेवा उपलब्ध नसल्याने वारकऱ्यांची गैरसोय होत होती.
त्यामुळे वारकऱ्यांनी नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली होती. वारकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन नैर्त्रुत्य रेल्वेने एक जुलैपासून हुबळी-पंढरपूर मार्गावर रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली आहे. पहाटे 5 वाजता हुबळी येथून निघालेली एक्स्प्रेस सकाळी 7.30 वाजता खानापूर येथे, सकाळी 8.15 वा. बेळगावला येणार आहे. दुपारी 4 वा. ही एक्स्प्रेस पंढरपूर येथे पोहोचणार आहे. सायंकाळी 6 वा. पंढरपूर येथून निघालेली एक्स्प्रेस मध्यरात्री 12 वा. बेळगावला पोहोचेल तर रात्री 3 वाजता हुबळी येथे पोहोचणार आहे. एक्स्प्रेसला धारवाड, लोंढा, खानापूर, देसूर, बेळगाव, पाच्छापूर, गोकाक, घटप्रभा, चिकोडी रोड, रायबाग, कुडची, उगार, शेडबाळ, विजयपूर, मिरज यासह इतर थांबे देण्यात आले आहेत. वारकऱ्यांनी या रेल्वेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नैर्त्रुत्य रेल्वेच्यावतीने करण्यात आले आहे.









