दापोली :
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की पडिक जमिनींमध्ये काजू, आंबा लागवडीचे काम शेतकरी हाती घेतात. यावर्षर्षीदेखील शेतकऱ्यांची त्यादृष्टीने लगबग सुरू झाली आहे. मात्र गेल्या चार वर्षातील आंबा-काजू लागवडीचा आढावा घेता काजू लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल दिसून येत आहे. यामुळे काजू लागवडीचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढल्याची माहिती दापोली कृषी अधिकारी कार्यालयाकडून समोर आली आहे.
यावर्षीदेखील फळझाड लागवडीला गती आली आहे. काजू, आंबा, नारळ, सुपारीची लागवड जोरदार सुरू आहे. परंतु काजूच्या झाडांना मागणी अधिक असल्याचे कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून समोर आले आहे. फळझाड लागवडीबाबत कृषीच्या विविध योजना आहेत. त्या योजनांचा अनेक शेतकरी फायदा घेताना दिसत असून काही शेतकरी स्वतः खासगीरित्या झाडे लावत असल्याचे समोर आले आहे.
कृषी विभागाकडून मिळालेल्या गत चार वर्षातील आकडेवारीनुसार काजूचे २ हजार ६७३ लाभार्थी शेतकरी असून आंब्याचे ४५५ लाभार्थी शेतकरी आहे. यात काजूची लागवड करणारे शेतकरी अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. शिवाय कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना फळझाड लागवडीबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत असून शेताच्या बांधावर जावून वृक्ष लागवडीबाबत सहकार्य, मार्गदर्शन केले जात असल्याचे पहायला मिळत आहे.
- दरवर्षी चांगले उत्पन्न
अन्य फळझाड लागवडी बरोबर काजू लागवडीतून देखील दरवर्षी चांगले उत्पन्न मिळते. पूर्वजांनी आणि वडीलांनी पिढीजात संभाळून ठेवलेल्या जमीनीमध्ये फळबाग लागवड केल्यास फायदेशीर ठरेल. पुढील पिढीलाही लाभ मिळेल, असा विश्वास कोंढेचे शेतकरी विश्वनाथ दळवी यांनी व्यक्त केला.








