बेळगाव : जलवाहिनी घालण्यासाठी बाजार गल्ली, वडगाव येथे रस्त्याच्या कडेला दोन महिन्यांपूर्वी खोदकाम करण्यात आले होते. जलवाहिनी घालण्यात आल्यानंतर चरीवर काँक्रीट किंवा डांबरीकरण करणे गरजेचे होते. मात्र, मातीचा भराव टाकून तसेच सोडून देण्यात आल्याने आता पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून गुडघाभर पाणी तुंबले आहे. एलअँडटीकडून शहरात 24 तास पिण्याच्या पाण्यासाठी मुख्य जलवाहिनी घालण्यासह गल्लोगल्लीत जलवाहिनी घातली जात आहे. मात्र, या कामाचा फटका नागरिकांना सहन करण्याची वेळ आली आहे.
अलीकडेच स्मार्टसिटी योजनेतून करण्यात आलेले काँक्रिटचे रस्ते फोडले जात आहेत. पाईपलाईन घालण्यात आल्यानंतर चरीमध्ये माती टाकून बुजविले जात आहे. खरेतर चरीवर काँक्रीट किंवा डांबरीकरण करणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नसल्याने ठिकठिकाणी चरी खचत आहेत. आता पावसाला सुरुवात झाली असल्याने रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरण्यासह गुडघाभर गढूळ पाणी तुंबले आहे. अशी परिस्थिती बाजार गल्ली, वडगाव येथे निर्माण झाली आहे. गढूळ पाण्यातून रहिवासी व वाहनचालकांना ये-जा करण्याची वेळ आली आहे. रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या व्यापाऱ्यांना देखील चिखलातच बसून आपले व्यवहार करावे लागत आहेत. त्यामुळे याकडे महानगरपालिकेने लक्ष घालून ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी केली जात आहे.









