पाणलोट क्षेत्रात संततधार कायम : आलमट्टीचा विसर्ग जैसे थे : पाणीपातळीत वाढ
वार्ताहर/एकसंबा
पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असून तालुक्यातील कृष्णा, दूधगंगा व वेदगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढच होत आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पसरत आहे. सध्याची स्थिती पाहता कृष्णा नदीचा पाण्याचा प्रवाह 1 लाखाहून अधिक क्युसेकने होत आहे. वाढत्या पाणी पातळीवर प्रशासन लक्ष ठेवून असून सध्याचे वातावरण पाहता पावसाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
चिकोडी व निपाणी तालुक्याला वरदान ठरलेल्या कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा, चिकोत्रा व पंचगंगा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पाणलोट क्षेत्रात यंदा जून महिन्यात अपेक्षेपेक्षा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीतही वाढ होत आहे. डोंगराळ भागातून मोठ्या प्रमाणात पाणी नदीपात्रात सरावात असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत कृष्णा नदीच्या पाणीपातळीत 2 फुटाहून अधिक वाढ झाली आहे. तसेच कृष्णा नदीच्या उपनद्यांचे पाणी पात्राबाहेर जात आहे.
विसर्गात वाढ
पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरुच असल्याने नद्या ओसंडून वाहत आहेत. महाराष्ट्रातील कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यातून पाण्याच्या प्रवाहात 11 हजार 41 क्युसेकने वाढ झाली असून गुरुवारी 74 हजार 83 क्युसेक पाणी येत होते. दूधगंगा नदीतून 5 हजार 632 क्युसेकने पाण्याचा प्रवाह वाढला असून 24 हजार 640 क्युसेकने पाणी येत होते. तर कल्लोळ कृष्णा नदीच्या प्रवाहात 16 हजार 673 क्युसेकने वाढ झाली असून 1 लाख 8 हजार 723 क्युसेक पाण्याचा प्रवाह कल्लोळ कृष्णा नदीच्या पात्रात सामावत होता. तर आलमट्टी धरणात 91 हजार 230 क्युसेक पाण्याची आवक होत असून 70 हजार 420 क्युसेक पाण्याचा विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे.









