रत्नागिरी :
भाजप महिला मोर्चाच्यावतीने कर्करोगासंबंधी मोफत तपासणी शिबीर घेण्यासंदर्भात जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सविस्तर प्रस्ताव मांडण्यात आला आहे. शहरातील प्रत्येक प्रभाग तसेच जिल्ह्यात महिलांमध्ये कर्करोगासंबंधी जागरूकता वाढवणे, त्याच्या लवकर निदान व उपचारासाठी मदत करणे आणि आरोग्यविषयक जनहिताचे कार्य प्रभावीपणे राबविणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे.
भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या प्रतिनिधींनी गुरुवारी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली व ब्रेस्ट कॅन्सर तसेच गर्भाशयाच्या कॅन्सरविषयी माहिती घेतली.
महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने, शहर व जिल्हास्तरावर मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्याच्या शक्यतेबाबत यावेळी रुग्णालयामधील डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये तसेच जिल्ह्यात महिलांसाठी मोफत तपासणी शिबीर घेता येईल का, याबाबत डॉक्टरांसमोर सविस्तर प्रस्ताव मांडला. डॉक्टरांनी यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा, मनुष्यबळ आणि सहकार्य उपलब्ध करून देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.
या भेटीदरम्यान महिला मोर्चाच्या वतीने अधिकृत निवेदन देखील जिल्हा रुग्णालयाला सादर करण्यात आले. महिला मोर्चा लवकरच या संदर्भात तपशीलवार योजना जाहीर करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या वेळी निवेदन देताना महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, सरचिटणीस नुपूर मुळे, शहराध्यक्षा पल्लवी पाटील, तालुकाध्यक्ष प्रियल जोशी, माजी नगरसेविका सुप्रिया रसाळ, प्रणाली रायकर, भक्ती दळी, सायली बेर्डे, वैभवी शिवलकर, कामना बेग, मनाली राणे, सारिका शर्मा यांची उपस्थिती होती.
या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील अनेक महिलांना वेळेत कर्करोग तपासणीची सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.








