वृत्तसंस्था/लंडन
भारत आणि यजमान इंग्लंड दिव्यांग संघामध्ये सुरू असलेल्या सात सामन्यांच्या टी-20 मालिकेतील लॉर्ड्स मैदानावर खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा शेवटच्या षटकात दोन गडी राखून पराभव केला. लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर पहिल्यांदाच दिव्यांगांच्या संघात पहिला सामना खेळविला गेला. योगायोगाने 42 वर्षांपूर्वी याच मैदानावर कपिलदेवच्या नेतृत्वाखाली 1983 साली भारतीय क्रिकेट संघाने आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 25 जून रोजी जिंकली होती. 25 जून हा दिवस विश्व मिश्र दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. हे औचित्य साधून लॉर्ड्स मैदानावर हा सामना खेळविला गेला. सात सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघाने टॉन्टन आणि वार्मस्ले येथील पहिले दोन सामने गमविले असल्याने आता या मालिकेत इंग्लंडचा संघ 2-1 असा आघाडीवर आहे. बुधवारच्या सामन्यात भारताने इंग्लंडला 20 षटकात 9 बाद 123 धावांवर रोखले. इंग्लंड संघातील ब्राऊनने 47 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकारांसह 47 धावा जमविल्या. ब्राऊनने नवव्या गड्यासाठी पायलेसमवेत 35 धावांची भागिदारी केली. त्यानंतर भारताने इंग्लंडवर थरारक विजय मिळविला. भारतीय संघातील साई आकाशने 44 धावा जमविल्या.









