प्रथमच मिळाला भारतीय अंतराळवीराला मान, भारताला पाठविले भावोत्कट संदेश
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अमेरिकेच्या स्पेसएक्स यानातूत अंतराळात झेप घेतलेला भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला याने आपल्या तीन सहकाऱ्यांसह अवकाशातील स्थानकात यशस्वी प्रवेश केला आहे. हा विक्रम करणारा तो प्रथम भारतीय अंतराळवीर आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी दुपारी चार वाजून एक मिनिटांनी स्पेसएक्सचे ‘ड्रॅगन’ हे अंतराळ यान अंतराळ स्थानकाशी जोडले गेले. त्यानंतर इतर सर्व तांत्रिक आवश्यकता पूर्ण केल्या गेल्या. नंतर शुभांशू शुक्ला आणि इतर तीन अंतराळवीरांनी यशस्वीरित्या स्थानकाच्या प्रयोगशाळेत प्रवेश केला आहे. भारताच sनागरीक शुभांशू शुक्ला हे या अंतराळवीरांचे गट कॅप्टन आहेत.
अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आणि रशियाची आंतराळ संस्था रॉसकॉसमॉस यांनी एकत्र येऊन या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची निर्मिती केली आहे. या अंतराळ स्थानकाची हे चौथे खासगी अंतराळ अभियान आहे. ‘अॅक्झिओम मिशन 4’ असे त्याचे नाव आहे. बुधवारी या अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या यानाचे अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील केनेडी अंतराळ केंद्रावरुन यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. तेव्हापासून सर्व भारतीयांना ज्या अभिमानास्पद क्षणाची प्रतीक्षा होती, तो गुरुवारी दुपारी प्रत्यक्षात आला आहे. अशा प्रकारे या अभियानाचा अर्धा भाग पूर्ण झाला आहे. अंतराळ स्थानकात काहीकाळ वास्तव्य करुन हे अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर हे अभियान पूर्ण होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
व्हिडीओवरुन यथादर्शन
नासाने या घटनाक्रमाचे व्हिडीओ यथादर्शन करण्याची सुविधा उपलब्ध केली होती. अंतराळ यान अंतराळ स्थानकाच्या जवळ येतानाची दृष्ये या व्हिडीओ पहावयास मिळाली आहेत. हे अभियान आतापर्यंत यशस्वी ठरले आहे. सर्व अंतराळवीर पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार अंतराळ स्थानकात प्रवेशले असून त्यांनी त्यांच्या कार्याला प्रारंभ केला आहे, असे निवेदन नासाने प्रसिद्ध केले आहे.
मिठ्या मारुन आनंद व्यक्त
अंतराळ स्थानकात पोहचल्यानंतर सर्व अंतराळवीरांनी एकमेकांना मिठ्या मारुन आनंद व्यक्त केला. ही दृष्येही व्हिडीओवरुन सर्वांना पाहता आली. अभियानाचा एक भाग यशस्वीरित्या आणि सुखरुपरित्या पार पडल्याचे समाधान या अंतराळवीरांच्या देहबोलीतून स्पष्टपणे दिसून येत होते. या यशामुळे भारतातही अंतराळप्रेमेंसह सर्वसामान्यांनी आणि शुक्ला यांच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला. सर्व अंतराळवीरांवर आता अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
अशी झाली प्रवेश प्रक्रिया
भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 4 वाजून 1 मिनिटांनी यान अंतराळ स्थानकाला जोडले गेले. हा टप्पा अत्यंत जटील असतो. बारा हुकसंचांच्या माध्यमातून भ्रमण करणारे अंतराळ यान भ्रमण करणाऱ्या अंतराळ स्थानकाला जोडले गेले. या टप्प्याला ‘सॉफ्ट कॅप्चर’ असे संबोधले जाते. त्यानंतर संपर्क यंत्रणा आणि विद्युत प्रवाह यांचा प्रारंभ करण्यात आला. नंतर अंतराळ स्थानकामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. याला ‘हॅच ओपनिंग’ असे नाव आहे. ही प्रक्रिया साधारणत: दीड तास चालली. अशा प्रकारे यान अंतराळ स्थानकाला जोडले गेल्यानंतर दोन तासांनी अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकात प्रवेश केला.
लहान मुलासारखे शिकतोय…
अतिलघु गुरुत्वाकर्षणाच्या स्थितीत कशा हालचाली करायच्या हे मी एखादे लहान मूल प्रथम चालायला शिकते, तसे शिकत आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया शुभांशू शुक्ला याने अंतराळ स्थानकातून पाठविली आहे. निर्वात पोकळीत तरंगण्याचा अनुभव अद्भूत आहे. त्याने व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून आपले अनुभव सर्वांसाठी मांडले आहेत. यानाच्या प्रक्षेपणापूर्वी 30 दिवस आम्हाला पूर्णत: विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तो कालावधी अगदीच अनुत्साही होता. केव्हा एकदा अवकाशात जातो, असे त्यावेळी मला झाले होते. आता प्रक्षेपण सुखरुप पार पडले. त्यानंतर आम्ही अंतराळ स्थानकात प्रवेश करण्याचा टप्पाही पार केला. आता अत्यंत उत्साह संचारला आहे, असा संदेश त्याने पाठविला आहे.
गुरुत्वाकर्षणहीनतेशी दोन हात
अवकाशात अंतराळवीरांसमोरचे सर्वात मोठे आव्हान तेथील अत्यल्प गुरुत्वाकर्षणाच्या परिस्थितीत हालचाली करणे हे असते. त्यासंबंधीही शुभांशू शुक्ला यांनी त्यांचे अनुभव संदेशाच्या स्वरुपात पाठविले आहेत. यानात आपल्या आसनावर बसल्यानंतर आणि यानाने प्रक्षेपण केल्यानंतर मला कोणीतरी आसनावर मागे ढकलत आहे असा भास झाला. आता आपले वजनही आपल्याला जाणवत नाही, असा अनुभव त्याने आपल्या संदेशातून व्यक्त केला आहे. पृथ्वीवर जो अनुभव कधीही मिळणार नाही, तो येथे येत असून आम्ही तो मनसोक्त उपभोगत आहोत. तो शब्दात वर्णन करता येणार नाही, असेही त्याने स्पष्ट केले आहे.
शुभांशू शुक्ला अंतराळात काय करणार…
शुभांशु शुक्ला यांचे अभियान केवळ औपचारिक नसून ते वैज्ञानिक आहे. ते अंतराळ स्थानकात 14 दिवस वास्तव्य करणार आहेत. या काळात ते अनेक महत्वाचे प्रयोग करणार आहेत. स्पेस न्यूट्रिशन, फूड सस्टेनिबिलीटी, स्पीड रीजनरेशन आदी प्रयोगांमध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग राहणार आहे.
शुभांशु शुक्ला यांचे अंतराळ कार्यक्रम
इस्रो-डीबीडी स्पेस न्यूट्रीशन कार्यक्रम-
- भारतीय पदार्थ मेथी आणि मूग यांच्या पोषण गुणधर्मावर महतवाचे प्रयोग
- ही बियाणी अत्यल्प गुरुत्वाकर्षण स्थितीत अशी उगवतात याचे निरीक्षण
- ही बियाणी नंतर पृथ्वीवर येणार, त्यांच्या अनेक पिढ्यांवर प्रयोग होणार
अवकाशात सजीवांनी स्वबळावर जगणे
- अंतराळात दीर्घकाळ वास्तव्याची शक्यता आणि भविष्यकालीन अंतराळ कृषी
- अंतराळात माणसांसाठी जैविक उनरुत्पादन व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयोग
नासा मानवी संशोधन कार्यक्रम
- अंतराळवीरांचे आरोग्य, अंतराळ परिस्थितीशी जुळवून घेणे, आदी प्रयोग
भारताची अंतराळ महत्वाकांक्षा
शुभांशू शुक्ला यांचे ही अंतराळ अभियान आणि त्यांचे अनुभव इस्रोच्या ‘गगनयान’ अभियानासाठी प्रत्यक्ष उपयुक्त ठरणार आहेत. 2027 मध्ये भारत अंतराळात आपला मानव पाठविणार आहे. भारतानेही अॅक्झीओमच्या या प्रकल्पात मोठी गुंतवणूक केली आहे. अवकाशात वास्तव्यासाठी भारतीय नागरीकांची क्षमता वाढविण्यास काय करावे लागणार, याची माहिती या अभियानातून मिळणार आहे. या अभियानातून भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतराळ संबंध अधिक बळकट होणार आहेत. दोन्ही देश भविष्यात संयुक्त अंतराळ अभियाने करु शकतील.
अवकाशात झेप ते स्थानकात प्रवेश…
बुधवारी-
- सकाळी 10.10 वाजता : प्रक्षेपणाच्या व्हिडीओ चित्रणास नासाचा प्रारंभ
- दुपारी 12.01 वाजता : अंतराळ यान ग्रीसचे अंतराळ केंद्रावरुन प्रक्षेपण
- दुपारी 12.15 वाजता : यानाचा त्याचा अपेक्षित कक्षेत यशस्वी प्रवेश
गुरुवारी-
- दुपारी 3.55 वाजता : अंतराळ यान स्थानकाच्या नजीक, 28 तास प्रवास
- दुपारी 4.01 वाजता : अंतराळ यानाची अंतराळ स्थानकाशी झाली जुळणी
- दुपारी 4.15 वाजता : स्थानकाची संपर्क यंत्रणा, विद्युत प्रवाह कार्यान्वित
- दुपारी 4.22 वाजता : स्थानक प्रवेशासाठी हॅच ओपनिंग प्रक्रियेचा प्रारंभ
- सायंकाळ 5.30 वाजता : सर्व अंतराळवीरांचा अंतराळ स्थानकात प्रवेश









