वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताने पाकिस्तानचे पाणी अडवले, तर भारताशी युद्ध केले जाईल, या पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बिलावल भुत्तो यांच्या धमकीचा सज्जड समाचार भारताचे जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. पाकिस्तानने कितीही धमक्या दिल्या किंवा गयावया केली, तरीही सिंधू जलकराराची स्थगिती उठविली जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी गुरुवारी येथे केली आहे. भुत्तो यांनी पोकळ धमक्या देऊ नयेत. आम्ही अशा वाचाळतेला भीक घालणार नाही. सिंधू जलवितरण करार स्थगित ठेवण्याचा निर्णय भारत सरकारचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने तो घेण्यात आला आहे. त्यामुळे तो लागू राहणार आहे. या करारानुसार भारताच्या वाट्याला जे पाणी आले आहे. त्यातील थेंबही आम्ही पाकिस्तानमध्ये वाहू देणार नाही. तसेच सध्या करार स्थगितच असल्याने आम्ही हे पाणी आडवून भारताच्या हितासाठी उपयोगात आणणार आहोत. आम्हाला कोणी रोखू शकत नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पाकिस्तानच जबाबदार
भारताने सिंधू जलवितरण करार स्थगित ठेवल्याने पाकिस्तानात वाहून जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याचा फटका पाकिस्तानच्या रब्बी पिकाला बसत आहे. मात्र, या स्थितीसाठी पाकिस्तान स्वत:च जबाबदार आहे. पाकिस्तानला भारतात दहशतवादी हल्ले करुन भारताला त्रास देण्याची खुमखुमी आहे. भारताचे निरपराध नागरीक मारण्यात त्याला स्वारस्य आहे. अशा स्थितीत भारत स्वस्थ बसू शकत नाही. भारत त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व सामर्थ्याचा उपयोग करुन पाकिस्तानला धडा शिकविणारच, अशा अर्थाचे विधान पाटील यांनी केले आहे.









