अमेरिकन दूतावासाकडून व्हिसा अर्जधारकांना सूचना : 5 वर्षांची ऑनलाइन अॅक्टिव्हिटी तपासली जाणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
व्हिसा अर्जधारकांना सर्व सोशल मीडिया युजरनेम अन् हँडल्सचा मागील 5 वर्षांचा खुलासा पार्श्वभूमी पडताळणीसाठी करावा लागणार असल्याचे भारतातील अमेरिकेच्या दूतावासाने गुरुवारी स्पष्ट केले आहे. या निर्देशाचे उल्लंघन केल्यास व्हिसा रद्द होऊ शकतो तसेच भविष्यातील व्हिसासाठी अपात्र ठरण्याचा धोका असल्याचे दूतावासाकडून सांगण्यात आले. मागील 5 वर्षांमध्ये वापरलेल्या सर्व सोशल मीडियावरील युजरनेम किंवा हँडल्सचा तपशील डीएस-160 व्हिसा अर्जावर नमूद करावा लागणार आहे. तसेच संबंधित माहिती खरी अन् योग्य असल्याचे अर्जदाराला स्वाक्षरी करत नमूद करावे लागणार असल्याचे अमेरिकेच्या दूतावासाने वक्तव्य जारी करत सांगितले आहे. व्हिसा प्रक्रियेत सुरक्षा वाढविणे आणि प्रामाणिकता सुनिश्चित करण्याच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या प्रयत्नांनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
तर मंगळवारी अमेरिकेच्या विदेश विभागाने विद्यार्थी व्हिसा अर्जांवरील प्रक्रिया पुन्हा सुरू केली होती. त्यावेळी पार्श्वभूमी पडताळणीसाठी विद्यार्थी व्हिसासाठी अर्ज केलेल्या सर्व लोकांना दूतावासाने सोशल मीडिया अकौंट्सची माहिती देण्याची सूचना केली होती. ‘एफ’, ‘एम’ किंवा ‘जे’ या नॉनइमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या सर्व व्यक्तींना स्वत:च्या सोशल मीडिया अकौंटच्या प्रायव्हेट सेटिंग्जना पब्लिक करण्याची सूचना तत्काळ प्रभावाने करण्यात येत आहे. याच्या माध्यमातून संबंधितांची ओळख पटविण्याची चाचणी आणि अमेरिकेच्या कायद्यानुसार त्यांना प्रवेश देण्यासंबंधी निर्णय घेण्यास मदत होणार असल्याचे अमेरिकेच्या दूतावासाने म्हटले आहे. ट्रम्प प्रशासनाने मागील महिन्यात जगभरातील स्वत:च्या दूतावासांना नव्या विद्यार्थी व्हिसासाठीच्या मुलाखती थांबविण्याचा आदेश दिला होता. तसेच एक्सचेंज व्हिजिटर व्हिसाचे अर्जही थांबविण्यास सांगितले होते.
जो बिडेन प्रशासनाच्या काळात स्थलांतरितांची योग्यप्रकारे पडताळणी करण्यात येत नव्हती, यामुळे ही व्यवस्था निरुपयोगी ठरली होती. अमेरिकेत प्रवेश करू इच्छिणाऱ्या लोकांची आता काटेकोरपणे पडताळणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. व्हिसा अर्जधारकांना आता स्वत:च्या सोशल मीडिया हँडल्स अन् अकौंट्सना स्क्रीनिंगसाठी पब्लिक करावे लागणार आहे. अमेरिकन नागरिक, मूल्यं, संस्था, संस्कृती किंवा देशाच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात असलेली ऑनलाइन अॅक्टिव्हिटी संबंधितांच्या सोशल मीडिया अकौंटवर आढळून आल्यास व्हिसा अर्ज फेटाळला जाणार असल्याचे समजते. अमेरिकेच्या विदेश विभागाने व्हिसा मंजूर करण्यापूर्वी सोशल मीडिया अकौंटची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोशल मीडिया व्हेट्टिंग
सोशल मीडिया व्हेट्टिंग म्हणजेच सोशल मीडिया अकौंट्सची पडताळणी ही अर्जधारकाच्या ऑनलाइन अॅक्टिव्हिटी संबंधिताच्या अमेरिकेतील प्रवेशाच्या पात्रतेकरता तपासली जाणार आहे. संबंधित विद्यार्थ्याला अमेरिकेतील शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेण्याची अनुमती देण्याचा निर्णय सोशल मीडिया अकौंट्सचा आढावा घेत अधिकारी घेणार आहेत. यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, एक्स, लिंक्डइन, टिकटॉकसह अन्य सामील असणार आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येवर नियंत्रण हे विशेषकरून अमेरिकन विद्यापीठातील पॅलेस्टाइनसमर्थकांच्या निदर्शनांच्या प्रत्युत्तरादाखल ट्रम्प प्रशासनाकडून केले जात असल्याचे मानले जाते. व्हिसा प्रक्रियेदरम्यान सोशल मीडिया माहितीचे विश्लेषण करत राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्याचा उद्देश असल्याचा दावा ट्रम्प प्रशासनाकडून करण्यात आला आहे. एफ व्हिसा हा प्रामुख्याने विद्यापीठ, महाविद्यालये किंवा अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अमेरिकेकडून जारी केला जातो. तर एम व्हिसा हा व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी जारी केला जातो. तर जे व्हिसा सांस्कृतिक आणि शैक्षणिक आदान-प्रदान कार्यक्रमाच्या अंतर्गत येणाऱ्या विदेशी लोकांना प्रदान केला जात असतो.









