पहिल्या डावात तीन अन् दुसऱ्या डावात दोन शतकं…दोन्ही डावांत मिळून 800 हून अधिक धावा अन् शेवटच्या दिवशी लहरी इंग्लिश वातावरणात प्रचंड दबावाखाली खेळण्याची पाळी यजमानांवर आलेली…तरीही 371 धावा करण्यापासून त्यांना रोखण्याचं आव्हान आपल्याला पेलता नाही…इंग्लंड दौऱ्यातील मालिकेचा आरंभ धक्कादायकरीत्या होण्यामागच्या कारणांची केलेली ही मीमांसा…
अतिशय अनुभवी खेळाडूंचा समावेश नसल्यानं भारताचं नेतृत्व पहिल्यांदाच करणाऱ्या शुभमन गिलला हेंडिग्लेवरील पहिल्या कसोटी सामन्यात बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं शोधावी लागणार असंच सर्वांना वाटत होतं…पण जे चित्र दिसलं ते वेगळंच, कल्पना करण्यास सुद्धा अशक्य असं…149 वर्षांच्या कसोटी इतिहासात प्रथमच तब्बल पाच शतकांची नोंद करूनही संघ हरला. भारतानं एकूण 835 धावांची नोंद केली, तरीही मार खाल्ला…इंग्लंडला जिंकण्यासाठी चौथ्या डावात गरज होती ती तब्बल 371 धावांची. परंतु पाचव्या दिवशी गोलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या भारतीय चमूला कसोटी अनिर्णित ठेवणं देखील जमलं नाही…असा पराक्रम करण्याची शक्ती अन्य एखाद्या देशात अजिबात नाहीये !…
जसप्रीत बुमराहनं पहिल्या डावात 83 धावांत 5 इंग्लिश फलंदाजांना गारद केलं आणि त्याची भेदक क्षमता दाखविली. पण दुसऱ्या डावात मात्र यजमान संघानं त्याच्याविरुद्ध अजिबात जोखीम पत्करली नाही. यावेळी गरज होती ती त्याला समर्थ साथ मिळण्याची. परंतु मोहम्मद सिराज सातत्यानं इंग्लिश फलंदाजांवर दबाव टाकण्यात सातत्यानं अपयशी ठरला, तर दोन्ही डावांत मिळून 5 बळी मिळविणाऱ्या प्रसिद्ध कृष्णानं प्रत्येक षटकामागं दिल्या त्या 6 पेक्षा जास्त धावा…त्यातच भारतात जादुगार भासणारा रवींद्र जडेजा हेडिंग्लेवर मात्र अक्षरश: फिका पडला…यामुळं आपलं आक्रमण बुमराहवर किती अवलंबून आहे ते उघड झालं…
अर्शदीप सिंगला किंवा कुलदीप यादवसारख्या अधिक आक्रमक मनगटी फिरकी गोलंदाजाला वगळल्यानं मारा फारसा भेदक वाटला नाही. शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीतही धार जाणवली नाही. त्यामुळं आता त्याच्या समावेशाविषयी एक मोठा प्रश्न निर्माण झालाय…असं असलं, तरी प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मात्र बर्मिंहगॅम इथं होऊ घातलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताच्या गोलंदाजीत फारसे बदल करण्याची शक्यता फेटाळून लावलीय…‘बुमराह व सिराजचा अपवाद सोडल्यास आमच्या संघात फारसा अनुभवी गोलंदाज नव्हता. प्रसिद्धनं बऱ्यापैकी मारा केला अन् महत्त्वाच्या वेळी बळीही मिळविले. त्याच्यात क्षमता आहे ती भविष्यात एक चांगला कसोटी गोलंदाज बनण्याची’, गंभीरचे शब्द…
विश्लेषकांच्या मतानुसार आता संधी मिळायला हवी ती नेहमीच अन्यायाला तोंड देणाऱ्या कुलदीप यादवला. इंग्लंडच्या 2023-24 मधील भारतीय दौऱ्यात त्यानं 20.14 सरासरीनं 19 फलंदाजांना गारद केलं होतं. शिवाय हॅरी ब्रूक व जेमी स्मिथ यांना फिरकी गोलंदाजांना चांगल्या पद्धतीनं खेळता येत नाही याचीही आठवण ठेवलेली बरी. जर हेडिंग्ले कसोटीत कुलदीपचा समावेश करण्यात आला असता, तर बुमरहला योग्य साथ देण्याची क्षमता त्याच्यात होती…संघात रवींद्र जडेजाच्या समावेशाचं समर्थन करणारी एक फळी असली, तरी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकासारख्या देशांतील कामगिरीचा विचार केल्यास त्याला काहीही अर्थ नसतो…
दोन्ही डावांचं विश्लेषण केल्यास भारतानं 72 धावांत तब्बल 13 बळी गमावले…समालोचकांच्या मते, त्यामुळं भारतानं दवडली ती 550 ते 600 पर्यंत मजल मारण्याची संधी. त्यांनी प्रयत्नच केला नाही असा याचा अर्थ नव्हे, परंतु इंग्लिश फलंदाजांप्रमाणं खेळपट्टीवर टिकणं त्यांना जमलं नाही एवढं मात्र खरं…पहिल्या डावात त्यांनी यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत आणि शुभमन गिलच्या जोरावर 3 बाद 430 अशी मजल मारली होती. पण त्यानंतर शेवटचे 7 गडी फक्त 41 धावांत परतले. त्यामुळं 600 धावा आवाक्यात आहेत असं वाटत असताना डाव 471 वर संपुष्टात आला…
दुसऱ्या डावातही परिस्थिती फारशी वेगळी राहिली नाही. पुन्हा एकदा पंत आणि राहुल यांच्यामुळं संघानं 5 बाद 333 अशी मोठी झेप घेतली. परंतु मधल्या व खालच्या फळीला त्यावर डोलारा उभारता आला नाही. त्यामुळं डाव पुन्हा कोसळून भर घालता आली ती फक्त 77 धावांची…पदार्पण करणारा साई सुदर्शन अन् दीर्घ काळ बाहेर राहावे लागल्यानंतर परतलेला कऊण नायर या दोघांच्याही समोर अशा स्थितीत ठसा उमटविण्याची सुवर्णसंधी चालून आली होती. पण त्याचा फायदा ते घेऊ शकले नाहीत…
दोन्ही डावांमध्ये भारताचं क्षेत्ररक्षण खराब राहिले आणि यशस्वी जैस्वालपेक्षा जास्त कठीण परिस्थिती कुणाचीही झाली नाही (यापूर्वी ऑस्ट्रेलियात देखील त्याच्या हातून असाच प्रकार घडला होता). त्यानं सामन्यात चक्क चार झेल सोडले. यापैकी एक महत्त्वपूर्ण जीवदान देण्यात आलं ते बेन डकेटला 97 धावांवर असताना. ते पुरेपूर अंगलट येऊन डकेटनं 149 धावांची निर्णायक खेळी केली. अशा प्रकारे संधी गमावणं भारताची गोची करून गेलं. जेव्हा सामना पाचव्या दिवसात जाऊन चुरशीचा होतो तेव्हा लहानसहान गोष्टीही खूप मोठा फरक घडवितात…
याच्या उलट इंग्लंडनं कधीही आपला आत्मविश्वास गमावला नाही. त्यांचा दृष्टिकोन शांत, सावध नि निर्भय राहिला. ते उतावीळे नव्हते, पण अतिसावधही नव्हते…डकेटच्या 149 धावा, पहिल्या डावातील अपयशानंतर क्रॉलीची 65 धावांची खेळी अन् ज्यो रूटच्या नाबाद 53 धावा यांनी त्यांच्या विजयाचा पाया रचला…पाचव्या दिवशी इंग्लंडनं सकाळच्या सत्रात उल्लेखनीय शिस्तीनं फलंदाजी केली, दबाव सहन केला आणि नंतर गरज पडल्यावर वेग वाढवला. कधी हल्ला करायचा आणि कधी डावाला बळकटी द्यायची याबाबतीत त्यांची समज भारतीय माऱ्याला खूप भारी पडली !
पहिल्या कसोटीतील पराक्रम…
- एका डावात 99 व दुसऱ्या डावात शून्य अशी कामगिरी विश्वातील सात फलंदाजांनी केलीय व त्यात समावेश झालाय इंग्लंडच्या हॅरी ब्रूकचा…पंकज रॉय, मुश्ताक अहमद, जेफ बॉयकॉट, अँड्य्रू हॉल, मिसबाह-उल-हक आणि बाबर आझम यांचाही या यादीत समावेश…
- इंग्लिश भूमीवर शतक झळकावणाऱ्या के. एल. राहुलनं नऊ कसोटी शतकांची नोंद केलीय. विशेष म्हणजे त्यापैकी तब्बल आठ विदेशांत…चार इंग्लंडविरुद्ध, दोन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि प्रत्येकी एक श्रीलंका, ऑस्ट्रेलिया नि वेस्ट इंडिजविरुद्ध…
- इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांत सलामीवीर या नात्यानं तीन शतकांची नोंद करणारा राहुल पहिला भारतीय…
- रिषभ पंत हा कसोटी इतिहासात दोन्ही डावांमध्ये शतकं (134 व 118) हाणणारा केवळ दुसरा यष्टिरक्षक. यापूर्वी झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवरनं लीड्स इथंच 142 व नाबाद 199 धावांच्या खेळी केल्या होत्या…
- पंत हा इंग्लंडविरुद्धच्या कसोटीच्या दोन्ही डावांत शतकं नोंदविणारा पहिलावहिला भारतीय…खेरीज ‘सेना’ देशांविरुद्ध (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड नि ऑस्ट्रेलिया) अशी कामगिरी करणारा पहिला यष्टिरक्षक… व रिषभनं दोन्ही डावांत मिळून 9 षटकार खेचले…पाहुण्या संघातील एखाद्या फलंदाजानं इंग्लंडमधील कसोटीत नोंदविलेला हा उच्चांक…
- विदेशातील 9 फलंदाजांनी इंग्लंडविरुद्ध दोन्ही डावांत शतकं झळकावण्याचा पराक्रम केलाय…या यादीतील ताजं नाव रिषभ पंत. त्यात समावेश वॉरन बार्डस्ले, स्टीव्ह वॉ, स्टिव्ह स्मिथ, जॉर्ज हेडली, गॉर्डन ग्रिनीज, शाय होप, अॅलन मेल्विल आणि ब्रुस मिचेल यांचा…

– राजू प्रभू









