सांगली :
धरणांचे पाणलोट क्षेत्र आणि क्षेत्राबाहेर मुसळधार सुरू असल्याने बहुतांशी धरणांत सरासरी चाळीस ते साठ टक्कयापर्यंत साठा झाला आहे. जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत जून महिन्याच्या सरासरीच्या १०६ टक्के पाऊस झाला आहे. सांगलीतील आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी १५ फुटांवर आहे. अलमट्टी धरणात गतवर्षी आजच्या दिवशी २६ टक्के असणारा साठा ६५ टक्कयांपर्यंत पोहोचल्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्हयाची चिंता वाढली आहे.
अलमट्टी धरणातील पाणीसाठा केंद्रीय जलआयोगाच्या नियमानुसारच करण्यात यावा, अशी मागणी सांगली आणि कोल्हापूर जिल्हयातील संघटना सातत्याने करत आहेत. अलमट्टी धरणातील साठयामुळे सांगली आणि कोल्हापूरच्या नदीकाठाला महापुराचा धोका असल्याने या धरणातील पाणीसाठ्याकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते. गतवर्षी संघटना आणि शासनाच्या रेट्यामुळे अलमट्टी धरणात २५ जूनअखेर केळ २६ टक्के म्हणजे ३२.१५ टीएमसी पाणीसाठा होता. यावर्षी दोन महिन्यापासून सांगली कोल्हापूरमध्ये आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारची वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. त्यानुसार अलमट्टीच्या पाण्यावर लक्ष ठेवण्यासाठी सांगली जिल्हयातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. परंतू बुधवारी सकाळी आठ वाजता या धरणातील पाणीसाठा ६५ टीएमसी झाला आहे. त्यामुळे नदीकाठ धास्तावला आहे.
सांगली आणि कोल्हापूर जिल्हयात पावसाचा जोर असल्याने दोन्ही जिल्हयातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. अलमट्टीत मोठया प्रमाणात पाणी आवक होत आहे. अलमट्टी धरणातील आवक आणि जावक जवळपास सारखीच ७० हजार क्युसेक्स पर्यंत आहे. परंतू या धरणातील साठा कमी करावा अशी मागणी होऊ लागली आहे.
- जिल्हयात १०६ टक्के पाऊस
जिल्हयात मे महिन्याच्या शेवटच्या सप्ताहापासूनच पावसाने जोर धरला आहे. जूनच्या सरासरीच्या १०६ टक्के पाऊस बुधवारी सकाळपर्यंत झाला. जिल्हयात १३७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.








