काकतीच्या दोघा जणांना अटक
बेळगाव : होनगा औद्योगिक वसाहत परिसरात गांजा विकणाऱ्या काकती येथील दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. काकती पोलिसांनी मंगळवारी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून एक किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या सूचनेवरून बेळगाव शहर व तालुक्यात अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडली आहे. मंगळवारी होनगा औद्योगिक वसाहत परिसरात गांजा विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे व सहकाऱ्यांनी अचानक छापा टाकून दोघांना अटक केली. प्रवीण सुरेश काकतीकर, इराप्पा यल्लाप्पा भाविनमनी दोघेही राहणार काकती अशी त्यांची नावे असून त्यांच्यावर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. नशामुक्त बेळगावसाठी ही मोहीम सुरू केल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. जप्त गांजाची किंमत 25 हजार रु. इतकी आहे.









