रत्नागिरी :
संगमेश्वरातील कसबा येथे होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक राष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी राज्य शासन स्तरावरून कार्यवाहीला प्रारंभ झाला आहे. येथील ५ एकर परिसरात होणाऱ्या नियोजनबद्ध केलेल्या प्रस्तावित कामांची आकर्षक रचनेमुळे हे स्मारक सर्वांचे लक्षवेधी ठरणार आहे. त्या परिसरात संग्रहालय, बंधारा, व्ही-गॅलरी, जुन्या मंदिरांचे जतन आदी विषयांच्या अनुषंगाने होणाऱ्या येथील बांधकामाला राज्य शासनाकडून निधी मिळताच गती येणार आहे.
एप्रिलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तेथेल नियोजित कामांची पाहणी करून स्मारकाला भव्यता आणण्यासाठी पुरातत्व व बांधकाम विभागाला सूचना केल्या होत्या. कसबा येथील कर्णेश्वर मंदिराला भेट देऊन छत्रपती संभाजी महाराज स्मारक जतन, संवर्धन आणि परिसर विकासासंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती. याप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत, महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार प्रमोद जठार यांसह जिल्हा प्रशासनातील अधिकारी, पुरातत्व विभागाचे स्थापत्य अभियंता असे सारेच उपस्थित होते. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून हे स्मारक मार्गी लागण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यानी यावेळी स्मारक परिसराच्या पाहणीदरम्यान सरदेसाई वाड्याला भेट दिली. यावेळी त्यांनी संग्रहालय, बंधारा, व्ही गॅलरी, दरांचे जतन आदी विषयांवर आर्किटेक्ट्ससोबत चर्चा केली. छत्रपती संभाजी स्मारक जतन, संवर्धन व परिसर विकास बैठकीत आढावा घेत पुरातत्व विभागाचे स्थापत्य अभियंता यांच्याकडून छत्रपती संभाजी महाराज स्मारक जतन, संवर्धन व परिसर विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले होते. हे स्मारक भव्य-दिव्य करण्यासाठी पुरातत्व आणि बांधकाम विभागाने देशभरातील अन्य मोठ्या प्रकल्पांचा अभ्यास करावा व या बाबत सूचना वाव्यात, असे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकास आराखड्यात संगमेश्वर मंदिर आणि पाट, मंदिर परिसर विकास, अॅम्फीथिएटर, ३ मंदिरांना जोडणारा पूल, पार्किंग, कुंभकेश्वर स्थळ विकास, कर्णेश्वर मंदिर, कंपाऊंड वॉल-कुंभकेश्वरकडे जाणारा दृष्टीकोन, स्तंभ, छत्रपती संभाजी महाराज पुतळा, बाडा, गाव कमान अशा तेथील साऱ्यांच्या बाबींचा अंतर्भाव करण्यात आला.
कर्णेश्वर मंदिर हे प्राचीन असून मंदिराचे बांधकाम उच्च प्रतीचे आहे. मंदिराचे पावित्र्य जपले जाईल, याची काळजी घ्यावी. महाराजांच्या स्मारकाच्या परिसरातील नदीकाठच्या मंदिरांचे जतन केले जाणार आहे. स्मारकासाठी भरघोस निधी दिला जाईल. स्मारक उभारताना ऐतिहासिक वारसा जतन करून येथील हवामानाला अनुरूप टिकाऊ बांधकाम केले जाणार आहे.








