जिल्ह्यात केंद्र-राज्य सरकारची योजना : 55 समूहाद्वारे होणार अंमलबजावणी : प्रति एकराला एक शेतकरी
बेळगाव : जिल्ह्यात 55 सूमह (क्लस्टर) निर्माण करण्यात आले असून या समुहाद्वारे नैसर्गिक शेती करण्यात येणार आहे. सदर योजना केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने राबविण्यात येणार असून, जिल्ह्यात 6875 एकर शेतीमध्ये नैसर्गिक शेती करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रति एकराला एक शेतकरी याप्रमाणे शेतकऱ्यांची निवड केली असून 6875 शेतकऱ्यांकडून जिल्ह्यात नैसर्गिक शेती करण्यावर भर देणार आहेत. शाश्वत शेतीच्या दिशेने पाऊल म्हणून बेळगाव जिल्ह्यात नैसर्गिक शेती करण्यात येणार आहे. ही योजना केंद्र सरकारची असून राज्य सरकारच्या सहयोगाने राबविण्यात येणार आहेत. रसायनमुक्त, पर्यावरणास अनुकूल शेती पद्धतीचा चालना देण्याचा यामागचा उद्देश आहे. स्वदेशी ज्ञान व स्थानिक संसाधनांचा वापर करून मातीचे आरोग्य पुनरुज्जीवित करणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.
नैसर्गिक शेतीसाठी जिल्ह्यातील 6875 शेतकऱ्यांची निवड केली आहे. विशेष म्हणजे देशी गाय पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राध्यान दिले असून निवड झालेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबद्दल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना किमान एक एकरवर नैसर्गिक करावी लागणार असून जीवामृत, बिजामृत व शेणखत आदी खतांद्वारेच शेती करावी लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्यधन देण्यात येणार असून काही साहित्यही पुरविण्यात येणार आहेत. आजकाल शेतकरी नैसर्गिक शेती सोडून रसायनयुक्त शेतीकडे वळले आहेत. कमी दिवसात जास्त पीक घेण्याची त्यांची धावपळ असते. पण रसायनयुक्त शेतीमुळे अनेक गंभीर आजारांना निमंत्रण मिळत असून आरोग्यवर याचे वितरित परिणाम होत आहेत. यासाठी रसायनयुक्त शेतीला फाटा देऊन शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळविण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. येणाऱ्या पिढीला शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी व त्यांना रसायनमुक्त माती देणे, हा यामागचा उद्देश आहे.
शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी योजना
हा उपक्रम नैसर्गिक ज्ञानाची व शेतकऱ्यांच्या अनुभवाची जोड देऊन शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी आहे. कृषी खात्याकडूनही मातीचे संवर्धन होण्यासाठी पावले उचलण्यात असून केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने नैसर्गिक शेती योजना कार्यान्वित केली आहे. याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होणार असून कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळणार आहे, असे कृषी खात्याचे सहसंचालक एच. डी. कोळेकर यांनी सांगितले.









