रस्त्याची अवस्था पुन्हा जैसे थे : डांबरीकरण किंवा काँक्रीट घालण्याची मागणी
बेळगाव : न्यू गांधीनगर येथील सेवा रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये टाकण्यात आलेला चिपिंगचा भराव मुसळधार पावसाने वाहून गेला आहे. त्यामुळे पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली असल्याने यासाठी खर्ची घालण्यात आलेला निधीदेखील पाण्यात गेला आहे. केवळ वरवरची डागडुजी न करता सदर रस्त्यावर डांबर किंवा काँक्रीट घालण्यात यावे, अशी मागणी रहिवासी व वाहनचालकांतून केली जात आहे. न्यू गांधीनगर येथे सांबऱ्याकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर गुडघाभर पाणी तुंबून रहात असल्याने डांबरी रस्ता उखडून मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्ग नसल्याने दरवर्षी त्या ठिकाणी पाणी तुंबत आहे. या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ असल्याने रस्ता उखडून दयनीय अवस्था निर्माण झाली होती. रस्त्यातून वाहने चालविताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
वाहनांचा वेग कमी होत असल्याने वाहतूक कोंडी
त्याचबरोबर या ठिकाणी आल्यानंतर वाहनांचा वेग कमी होत असल्याने वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने खड्ड्यांवर चिपिंगचा भराव टाकला होता. तसेच त्यावर डांबरीकरण केल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले होते. मात्र, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावरील भराव वाहून गेला आहे. त्यामुळे पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक न करता प्रशासनाने त्या ठिकाणी डांबरीकरण किंवा काँक्रीट घालावे.









