नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ : शेत शिवारांमध्ये साचले पाणी : पिकांचे नुकसान : पावसाचा जोर
वार्ताहर/किणये
तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. गेल्या चार दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे नदी नाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. तसेच शेत शिवारात पाणी साचून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बुधवारी दुपारी काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली. मात्र सायंकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढला होता. पावसामुळे हवामानात कमालीचा बदल झाला आहे. नागरिक अक्षरश: गारठून गेले आहेत. सतत सुरू असलेला पाऊस आणि हवामानातील गारठा यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अधिक पावसामुळे शेतशिवारातील कामे ठप्प झाली आहेत. मंगळवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. पुन्हा बुधवारी सकाळी संततधार सुरू होती. दुपारी हलक्या सरी बरसत होत्या. मात्र सायंकाळी पावसाने जोर घेतला.
या पावसामुळे अनेक गावातील संपर्क रस्त्यांवर पाणी आले आहे. गावागावातील नाल्यांवरील असलेल्या पुलापर्यंत पाणी आले आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास विविध गावांतील रस्त्यावरील पुलांवर पाणी येऊन अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील किणये-संतिबस्तवाड येथील मुंगेत्री नदीच्या पाणीपातळीत पावसामुळे वाढ झाली आहे. संतिबस्तवाड जुन्या रोडवरील नदीच्या जुन्या पुलापर्यंत पाणी आले आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास जुन्या पुलावर पाणी येण्याची शक्यता आहे. रविवारपासून तालुक्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. मंगळवारी तर अक्षरश: मुसळधार पाऊस झाला. तालुक्यातील शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुटी जाहीर केली तसेच बुधवारीही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे गुरुवारी शाळांना सुटी पुन्हा जाहीर करण्यात आली आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शिवारात भाताची पेरणी केली होती. भातपिके उगवून आली होती. यामध्ये कोळपणी करण्यात आली होती. याच कालावधीत चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोवळी भातपिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे भातपिके खराब झाली असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. बुधवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता. यामुळे पिरनवाडी, मच्छे, राकसकोप, बेळवट्टी आदी भागातील रस्त्यांवर पाणी आले होते. हवामानात मोठ्याप्रमाणात गारठा निर्माण झाल्यामुळे तालुक्याच्या विविध गावांमध्ये नागरिक आजारी पडू लागले आहेत. पावसामुळे कोथिंबीर, मिरची, बिन्स आदी भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कंग्राळी खुर्द भागातील मार्कंडेय नदीला पूर 
गेले दोन दिवस पडत असलेल्या आर्द्रा नक्षत्राच्या धुवाधार पावसाच्या पाण्याने कंग्राळी खुर्द किर्यात भागातील जीवनदायीनी मार्कंडेय नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठ शिवारातील भातपिके व रोप लागवडीसाठी टाकलेले तरवे कुजून जाणार र्आहेत. नदीकाठ शिवारातील शेतकरी वर्गाला दुबार भात पेरणी व दुबार भात रोप तरवे घालण्याची वेळ येणार आहे. जर पावसाने उघडीप दिल्यास हे साध्य होणार आहे. नाहीतर नदीकाठ शिवारामध्ये भात रोप कुजून भात रोप कोठून आणणार, अशी चिंता शेतकरी वर्गाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
अरूंद नदीपात्राचा परिणाम 
मार्कंडेय नदीपात्रामध्ये शेतकरी वर्गाकडूनच अतिक्रमण झाल्यामुळे नदीपात्राला एखाद्या ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे सुद्धा नदीपात्राचे पाणी लगेच पात्राबाहेर येऊन शिवारामध्ये पसरत असते. पाटबंधारे खात्याने जर शासकीय दप्तरी मार्कंडेय नदीच्या पात्राची रूंदी किती आहे. याची तपासणी करून पात्राची रूंदी वाढविल्यास पावसाचे पाणी नदीपात्रातून वाहत राहील. यामुळे शेतकरीवर्गाला प्रत्येकवर्षी भातरोप लागवडीसाठी दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा ही खटपट थांबेल व शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.









