वृत्तसंस्था / नवी दिल्ली
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची (केआययूजी) पाचवी आवृत्ती नोव्हेंबरमध्ये जयपूरमध्ये होणार असून यामध्ये 4 हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता आहे, अशी घोषणा क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी बुधवारी केली.
पूर्णिमा विद्यापीठ आणि राजस्थान विद्यापीठ संयुक्तपणे या 25 वर्षांखालील बहुक्रीडा खेळांचे आयोजन करतील, ज्यामध्ये 200 हून अधिक विद्यापीठ सहभागी होतील. मागील आवृत्त्यांप्रमाणे केआययूजी 2025 कार्यक्रमात किमान 20 क्रीडाप्रकारांचा समावेश असेल. ‘खेलो इंडिया युथ गेम्स नोव्हेंबरमध्ये राजस्थानमध्ये होणार आहेत, हे जाहीर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. हे गेम्स 25 वर्षांखालील खेळाडूंसाठी आहेत आणि यावर्षी मे महिन्यात बिहारमध्ये झालेल्या 18 वर्षांखालील खेलो इंडिया युथ गेम्सनंतर येतील,’ असे मांडविया यांनी क्रीडा मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. देशातील सर्वोत्तम प्रतिभेला आकर्षित करणाऱ्या आमच्या असंख्य स्काऊट्सना प्रभावित करण्याकरिता राष्ट्रीय व्यासपीठ शोधणाऱ्या खेळाडूंसाठी हे गेम्स उत्तम संधी देतात, असे ते म्हणाले. जगभरात विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे बहुक्रीडा स्पर्धांमध्ये वर्चस्व आहे. राजस्थानमध्ये आम्हाला आशा आहे की खेळाडू त्यांच्या शिखरावर असतील म्हणून काही दर्जेदार कामगिरी पाहण्याची आम्हाला आशा आहे.
आसाम, अरुणचालप्रदेश, मेघालय, मिझोराम, सिक्कीम, नागालँड आणि त्रिपुरा यांनी सहयजमानपद भूषवलेल्या केआययूजी 2024 मध्ये चंदीगड विद्यापीठाने सांघिक अजिंक्यपद जिंकले होते. लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी दुसऱ्या क्रमांकावर तर अमृतसरचे गुरु नानक देव विद्यापीठ तिसऱ्या क्रमांकावर होते. ईशान्य भारतात पहिल्यांदाच झालेल्या 2024 च्या आवृत्तीत एकूण 770 पदके, 240 सुवर्ण, 240 रौप्य आणि 290 कांस्य देण्यात आली होती. केआययूजी 2024 मध्ये 200 हून अधिक विद्यापीठांनी 11 दिवस स्पर्धा केली, ज्यामध्ये 4500 खेळाडूंनी 20 खेळांमध्ये भाग घेतला होता.









