तुडूंब भरण्यासाठी 13 फूट पाण्याची आवश्यकता
वार्ताहर/तुडये
बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय पाणलोट क्षेत्रात मंगळवारी दिवसभर संततधार पावसाने अक्षरश: झोडपून काढल्याने पाणीपातळी दोन फुटाने वाढ झाली. जलाशयात एकूण 16 फुट पाणीसाठा शहराला पुरवण्यासाठी उपलब्ध झाला आहे. जलाशय तुडूंब होण्यासाठी आता 13 फूट पाण्याची आवश्यकता आहे. मंगळवारी सकाळी 83 मि.मी. पावसाची नोंद झाली. तर यावर्षी सर्वांत जास्त एकूण 772.2 मि.मी. पाऊस झाला आहे. सोमवारच्या पाणीपातळीत भर पडत 2460 फुटावर पाणीपातळी गेली. दिवसभरातील पावसामुळे पाणीपातळी सायंकाळी 6.30 वाजता 2462 फूट झाली. दिवसभर दोन फूट पाणीपातळी वाढली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने रात्रभरात आणखी दोन फूटभर पाणीपातळीत वाढ होणार आहे.
जुनी पाणीपातळी दोन दिवसांत पूर्ण होणार
1962 साली उभारण्यात आलेल्या या जलाशयाची पाणीपातळी ही 2465 फुटापर्यंत ठेवण्यात आली होती. बेळगाव शहराला पाण्याचा वाढती गरज ओळखून बेळगाव शहर पाणीपुरवठा मंडळाने 1980 साली जलाशय तुडूंब भरुन वाहणारे पाणी दसऱ्यानंतर सलग चार वर्षे सिमेंट पोत्यातून माती भरुन त्याचा बंधारा उभारत अडविण्याची संकल्पना राबविली होती. पाणी टंचाई दूर करण्यासाठी 1985 साली मार्कंडेय नदीवर सहा लोखंडी दरवाजे उभारत पाणीपातळीत 2465 फुटावरुन 2475 फुटापर्यंत वाढ करण्यात आली. 1985 पासून 2016 सालापर्यंत जलाशय हा 2475 फुटावर ओव्हर फ्लो होत होता. त्यानंतर या सहा दरवाजांवर माती भरुन पिशव्या ठेवत एक फूट पाणीपातळीत वाढ करण्यात आली.
या दरवाजांवर एक फुटाने लोखंडी पत्रे मारुन पातळीत वाढ केली. त्यात भर तीन फुटाचे पत्रे वेल्डिंगने बसवत पाणीपातळी ही 2478 फुटापर्यंत वाढवलेली आहे. 2022 साली तुडये-मळवी येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे वाढीव पाण्यामुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी त्यास विरोध दर्शविला. त्यानंतर चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील, महाराष्ट्र राज्याचे पाटबंधारे खात्याचे मंत्री, सचिव, बेळगाव पालकमंत्री, कर्नाटकाचे पाटबंधारे खात्याचे मंत्री, सचिवांची एक बैठक मुंबई येथे झाली आणि पाणीपातळी ही 2475 फुटावर स्थिर ठेवण्याचे ठरविल्यानंतर जलाशय ओव्हर फ्लो होणे बंद झाले. जलाशयाने 2475 फुटावर पातळी गाठल्यानंतर पाणी दरवाजांमधून सोडण्यात येते.









