भरपावसात नागरिक अंधारात : रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू
बेळगाव : जोरदार वाऱ्यासह मंगळवारी सकाळपासून झालेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळली. झाडे, तसेच फांद्या वीजवाहिन्यांवर कोसळल्याने वीजपुरवठा ठप्प झाला. यामुळे नागरिकांना बराचकाळ अंधारात घालवावा लागला. तर काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मरमध्ये पाणी शिरल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या. मंगळवारी सकाळपासून शहरासह तालुक्याला पावसाने झोडपले. जुनाट व धोकादायक वृक्ष कोसळल्याने हेस्कॉमचे नुकसान झाले. पोस्टमन सर्कल ते रेल्वेस्टेशन रोडवर मंगळवारी सकाळी एक वृक्ष कोसळला. वृक्ष मुख्य रस्त्यावरच कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. हा वृक्ष जवळपासच्या वीजवाहिन्यांवर कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. तब्बल दीड तासानंतर या परिसरातील वीजपुरवठा हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी सुरळीत केला. याचबरोबर शहराच्या इतर भागातही झाडांच्या फांद्या कोसळल्याने वीजवाहिन्यांचे नुकसान झाले. ट्रान्सफॉर्मर निकामी झाल्याने काही भागात वीजपुरवठा ठप्प होता. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जोरदार पावसातही दुरुस्तीचे काम हेस्कॉमकडून युद्धपातळीवर सुरू होते.
पूर्वनियोजनामुळे नुकसान टळले
शहरात काही ठिकाणी झाडे कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. परंतु तो त्वरित दुरुस्त करण्यात आला. पावसाळ्यापूर्वी हेस्कॉमने वीजवाहिनींना अडथळे ठरणारी झाडे व त्यांच्या फांद्या बाजूला केल्या होत्या. त्यामुळे मोठा पाऊस होऊनही तितके नुकसान झाले नाही.
– ए. एम. शिंदे, साहाय्यक कार्यकारी अभियंता









