बेळगाव : वकील व नागरिकांना सोईस्कर व्हावे व त्यांना ये-जा करण्यासाठी कोट्यावधींचा निधी खर्च करून भुयारी मार्ग करण्यात आला आहे. मात्र वापराविना सदर भुयारी मार्ग आहे तसाच पडून आहे. परिणामी मुसळधार पावसामुळे भुयारी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून स्विमिंग पूलचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान कोणी भुयारी मार्गावर गेल्यास धोका उद्भवू नये, यासाठी प्रशासनाने दोन्ही बाजूंकडून मार्ग बंद करावा किंवा मार्गातील पाणी बाहेर काढण्याची आवश्यकता आहे.
या परिसरात जिल्हाधिकारीसह विविध सरकारी कार्यालये कार्यान्वित असून मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला न्यायालये व वकिलांची ऑफिस आहेत. यामुळे या परिसरात नागरिकांची वर्दळ असते. वकील व नागरिकांना ये-जा करावे लागते. याची दखल घेऊन वकील व नागरिकांना येण्या-जाण्यासाठी सोप होईल, या उद्देशाने कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून भुयारी मार्ग करण्यात आला. मात्र वापराविना मार्ग बंद अवस्थेत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहर परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी होत आहे. परिणामी भुयारी मार्गावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. जर असाच पाऊस कोसळत राहिल्यास मार्गावर आणखी पाणी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. कारण याबाबत माहिती नसलेले नागरिक जर भुयारी मार्गावर गेले तर धोका उद्भवू शकतो. यासाठी वेळीच पावले उचलून दोन्ही बाजूकडील मार्ग बंद करून मार्गातील पाणी काढण्याची आवश्यक आहे.









