सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम : लोकमान्य रंग मंदिर येथे उद्या आयोजन : नावाजलेले कलाकार आकर्षण
बेळगाव : शहापूर कोरे गल्ली येथील सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य मराठी विकास संस्था मुंबईच्या सहकाऱ्यांनी गुरुवार दि. 26 जून रोजी ‘अक्षरधारा’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. लोकमान्य रंग मंदिर येथे सायंकाळी 5.30 वाजता होणारा हा कार्यक्रम सर्वांना खुला आहे. उत्तरा मोने संचालित मिती ग्रुप निर्मित या कार्यक्रमाची संकल्पना व सूत्रसंचालन त्यांचेच असणार आहे. यामध्ये अभिनेते संजय मोने, आस्ताद काळे, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा सहभाग आहे.
त्यांचा परिचय पुढीलप्रमाणे-संजय मोने हे मराठी चित्रपट व नाट्यासृष्टीतील नावाजलेले अभिनेते आहेत. ‘अवघाचि संसार, माझिया प्रियाला प्रित कळेना, आभाळ माया, कानाला खडा, दे धमाल’ या टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. 20 हून अधिक चित्रपटात त्यांनी अभिनयाची छाप उमटवली आहे. याशिवाय झिंग चिक झिंग’, म्हैस, अ रेनी डे, बस स्टॉप व बारायण आदी नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. 9 कोटी 57 लाख या नाटकाला ‘झी’ टीव्हीचा पुरस्कार मिळाला आहे. ऐश्वर्या नारकर या मराठी चित्रपटसृष्टी, मालिका आणि नाटक अशा तीनही क्षेत्रांमध्ये 25 वर्षांहून अधिक काळ सक्रीय आहेत.
‘लेक माझी लाडकी’, ‘स्वामिनी’, ‘या सुखांनो या’ यासह अनेक मालिका तसेच हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमध्ये त्यांनी खलनायिका म्हणून छाप उमटवली. 32 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. याशिवाय मी माझ्या मुलांचा, लग्नाची बेडी, सोयरे सकल यासह अनेक नाटकात काम केले आहे.
आस्ताद काळे यांनी ‘निर्दोष’, ‘फर्जंद’, ‘रेड’, ‘अफेयर’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘पुढचं पाऊल’ आणि ‘सरस्वती’ या टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी काम केले आहे. ‘लग्न कल्लोळ’ हे त्यांचे पहिले मराठी नाटक आहे. बॉक्स ऑफिसवर हिट झालेल्या ‘छावा’ चित्रपटामध्ये त्यांची भूमिका आहे. बिग बॉस मराठीचेही ते स्पर्धक होते. उत्तरा मोने यांनी 32 वर्षांपासून आकाशवाणी, दूरदर्शन आणि प्रतिष्ठित कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. मिती, एंटरटेन्मेंटच्या माध्यमातून ‘सुवर्ण मराठी’ या सांगीतिकेची निर्मिती त्यांनी केली आहे. दादर सांस्कृतिक मंचच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत. तेजस्विनी महोत्सव, फूड फेस्टिवल अशा शासकीय सोहळ्यांचे संपूर्ण नियोजन त्या करतात. ‘मिती’तर्फे गेल्या 10 वर्षांपासून श्रावण महोत्सव या भव्य पाककला स्पर्धेचे आयोजन त्यांनी केले आहे. गोष्टी गाण्यांच्या या कार्यक्रमाचे त्यांनी 100 भाग पूर्ण केले आहेत. तसेच वाचू आनंदे हा अभिवाचनाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे.









