निपाणी तालुक्यात पावसाचा जोर वाढला : धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस : तालुका प्रशासन अलर्ट : संततधार पावसाने शेतकरी वर्गात चिंता
निपाणी/संकेश्वर : गेल्या दोन दिवसांत निपाणी शहर व परिसरात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी रात्रीपासून मंगळवारी दिवसभरही पाऊस सुरुच राहिल्याचे दिसून आले. धरण क्षेत्र व नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने दूधगंगा आणि वेदगंगा नद्या पात्राबाहेर गेल्या आहेत. तालुक्यातील आठ पैकी कारदगा-भोज आणि भोजवाडी-कुन्नूर, जत्राट व सिदनाळ हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या दोन्ही बंधाऱ्यांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.
मृग नक्षत्राच्या अखेरीस पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. राधानगरी तसेच गारगोटी भागातही पाऊस मंदावला होता. मात्र आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोर घेतला आहे. यामुळे पुन्हा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांचे पाणी पात्राबाहेर शेतात घुसले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व पावसामुळे तालुक्यातील चार बंधारे पाण्याखाली गेले होते. पाऊस ओसरताच सर्व बंधारे खुले झाले होते. मात्र गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा दोन बंधारे पाण्याखाली गेले असून पावसाचा जोर कायम राहिल्यास जत्राट आणि सिदनाळ हे दोन बंधारेही बुधवारपर्यंत पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
मंगळवारी काळम्मावाडी धरण क्षेत्रात अवघ्या 24 तासांत तब्बल 151 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर गारगोटी भागात असलेल्या पाटगाव धरण क्षेत्रात 24 तासांत 82 मिलिमीटर पाऊस झाला आहे. वेदगंगा नदीत यमगर्णी येथे सुमारे 8000 क्युसेक इतकी पाण्याची आवक होत आहे. तर कोगनोळी येथे दूधगंगा नदीत सुमारे 5000 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. मंगळवारी काळम्मावाडी धरण क्षेत्रात 35 टक्के तर पाटगाव धरण क्षेत्रात 65 टक्के इतका पाणीसाठा होता. पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. सुदैवाने आतापर्यंत निपाणी तालुक्यात पावसामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. तरीही तालुका प्रशासनाने सतर्कता बाळगत तालुक्यातील नोडल अधिकारी व त्यांच्या पथकास सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी कारदगा-भोज आणि भोजवाडी-कुन्नुर हे दोन बंधारे पाण्याखाली गेल्यानंतर नोडल अधिकाऱ्यांनी तेथे भेट देऊन बॅरिकेड्स लावून वाहतूक बंद केली.
दोन दिवसात जवाहर ओव्हरफ्लो?
निपाणी शहराबरोबरच डोंगर भागातही मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे शिरगुप्पी ओढ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह जवाहर तलावात मिसळत आहे. परिणामी तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी सकाळी जवाहर तलावाची पाणीपातळी 44 फूट 8 इंच होती. त्यामुळे बुधवार व गुरुवारपर्यंत तलाव ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.









