विटा :
भाजपवासी झालेले विट्याचे नेते वैभव पाटील आणि शहरातील भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल म. बाबर यांची एकोपा एक्सप्रेस पुन्हा सुरू झाली आहे. नागरी समस्या घेऊन विटा नगरपालिकेत गेलेल्या वैभव पाटील यांच्या पाठोपाठ गेलेल्या अनिल म. बाबर यांनी एकत्रित मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत नव्या-जुन्यांचा समन्वय झाल्याचे दाखवून दिले. विशेष म्हणजे विट्यातील भाजप कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर दोघांचे एकत्रिच छायाचित्र प्रसारीत करीत ऐक्य एक्स्प्रेस सुरू झाल्याचे संकेत दिले.
विट्याचे नेते वैभव पाटील यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. मुळात खानापूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीत जुने निष्ठावंत आणि आ. गोपिचंद पडळकर असे दोन प्रवाह आहेत. त्यात आता विट्याच्या पाटलांची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे हे तीन प्रवाह एकत्रित येणार काय?, त्यांचे मनोमिलन कधी आणि कसे होणार? याबाबत राजकीय जाणकारांत उत्सुकता आहे. अशातच माजी आ. सदाशिव पाटील आणि अनिल म. बाबर यांच्यात झाल्याचे समजते. मात्र आ. गोपिचंद पडळकर आणि माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी अद्याप खानापूर मतदारसंघातील आपली भूमिका अद्याप जाहीर केली नाही.
या पार्श्वभूमीवर सोमवारी अचानक नव्या भाजप कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर ज्येष्ठ नेते अनिल म. बाबर आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांचा मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्यासोबत चर्चा करतानाचे छायाचित्र प्रसारीत केले. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांच्या नजरा नगरपालिकेकडे वळल्या नसत्या तरच नवल. विटा नगरपालिकेत माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी शहरातील समस्या संदर्भात कार्यकर्त्यांसोबत मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी विनोद पाटील, फिरोज तांबोळी, मंगेश हजारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. अगदी काही क्षणातच भाजपाचे ज्येष्ठ नेते अनिल मनोहर बाबर हे भवानी माळ येथील बॅडमिंटन हॉल सुरू करावा, अशी मागणी घेऊन मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात दाखल झाले.
अचानक दोन्ही जुने-नवे गट एक संघपणे नगरपालिकेत एकत्र दिसल्याने भाजप कार्यकर्ते रिचार्ज झाले. याबाबत दोन्ही नेत्यांनी राजकीय बोलणे टाळले असले तरी वैभव पाटील यांच्या समाजमाध्यमावर अनिल म.बाबर व पाटील यांचे एकत्रित नगरपालिकेतील बसलेले फोटो प्रसिद्ध करण्यात आले. त्यामुळे आता शहरातील भारतीय जनता पार्टीत निष्ठावंत व नव्यांची ऐक्य एक्स्प्रेस सुरू झाली आहे. ही ऐक्य एक्प्रेस सुसाट सुटणार की पुढच्या स्टेशनवर बांबा घेणार, याचे उत्तर लवकरच मिळेल. शिवाय आ. पडळकर यांची भूमिका आता निर्णायक ठरणार आहे. त्यांच्या भूमिकेकडेही कार्यकर्त्याच्या नजरा लागल्या आहेत.
- राजकीय रणांगण तापू लागले
दरम्यान, सध्या नगरपालिकेत वॉर्ड रचना करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांचे नगरपालिकेतील हलचालींवर बारीक लक्ष आहे. भाजप नेते नगरपालिकेतून बाहेर पडताच शिवसेनेचे माजी नगरसेवक अमर शितोळे, समिर कदम, संजय भिंगारदेवे, रणजित पाटील आदी कार्यकर्ते मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या दालनात पोहचले. त्यांनीही विविध नागरी समस्या, घरकुल यादी याबाबत मुख्याधिकारी पाटील यांच्याशी चर्चा केली. एकंदरीतच यामुळे नगरपालिकेचे रणांगण तापू लागले आहे, हे दिसून येत आहे.








