दोन मालवाहू रेल्वेमुळे वाहतूक खोळंबली
बेळगाव : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या काहीही केल्यास सुटता सुटेना. सोमवारी टिळकवाडी येथे दुसरे रेल्वेगेट परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तब्बल अर्धा तासाहून अधिकवेळ काँग्रेस रोड येथे कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ही वाहतूक तिसऱ्या व दुसऱ्या रेल्वेगेट मार्गे वळविण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी 4.30 वा. मालवाहू रेल्वे आल्याने रेल्वेगेट बंद झाले. त्यानंतर पाठोपाठ जेएसडब्ल्यूची वाहतूक करणारी दुसरी मालवाहू रेल्वे आल्याने तब्बल अर्धा तासाहून अधिक वेळ वाहतूक ठप्प होती. यामुळे काँग्रेस रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या. पहिल्या रेल्वेगेटपर्यंत वाहनांच्या रांगा पोहोचल्याचे दिसून आले. वाहतूक वळविण्यात आल्याने वाहनांची प्रचंड कोंडी होत आहे. विशेषत: रेल्वेगेट बंद झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे आहे. सोमवारी एकाचवेळी दोन मालवाहू रेल्वे आल्याने ही कोंडी झाली असली तरी असे प्रकार वारंवार घडत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.









