सांगली :
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ‘अ’ ऑडीट वर्ग मिळाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत १२ ते १३ टक्के जास्त प्रगती झाली असे वैधानिक लेखापरिक्षक मालाणी असोसिएट यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे. जिल्हा बॅ केच्या मागील तीन वर्षाच्या प्रगतीवर त्यांनी शिक्कामोर्तब केल्याचे बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची सभा अध्यक्ष नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. या सभेत बँकेचे वैधानिक लेखापरिक्षक मालाणी असोसिएट पुणे यांनी बँकेचा २०२४-२५ या वर्षाचा ऑडिट अहवाल सादर केला. या अहवालाची माहिती देताना अध्यक्ष नाईक म्हणाले, बँकेच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी केलेल्या ऑडिटमध्ये बँकेच्या कामकाजावर समाधान व्यक्त करण्यात आले आहे. बँकेला पुन्हा एकदा ‘अ’ ऑडिट वर्ग देण्यात आला आहे. गेल्या काही वर्षापासून बँकेने सतत ‘अ’ ऑडीट वर्ग मिळवला.
जिल्हा बँकेने २०२३-२४ या वर्षाच्या त्तुलनेत २०२४-२५ या आर्थिक वर्षात १२ ते १३ टक्केनी जादा आर्थिक प्रगती केली आहे. ही बाब वैधानिक लेखा परिक्षकांनी अधोरेखित केली आहे. जिल्हा बँकेने २०२४-२५ मध्ये आठ हजार ८९२ कोटींच्या ठेवी मिळवल्या आहेत. कर्ज वाटप सात हजार ८८ कोटींचे आहे. बँकेचा ग्रॉस एनपीए ५३४ कोटी असून याची शंभर टक्के तरतूद करण्यात आली आहे. ग्रॉस एनपीए ७.५३ टक्के तर बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के झाला आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या तीन वर्षात सर्वच पातळीवर मोठी आर्थिक प्रगती केली आहे. यावर बँकेच्या वैधानिक लेखा परिक्षकांनी शिक्कामोर्तब केले असल्याचे मानसिंगराव नाईक यांनी सांगितले. बँकेचे सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्यामध्ये योगदान असल्याचेही नाईक यांनी सांगितले.
- शून्य टक्के एनपीएची महत्त्वाची कामगिरी
जिल्हा बँकेच्या संचालक, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने नेट एनपीए शून्य टक्केवर आणला आहे. नेट एनपीए शून्य टक्के करण्याबरोबरच बँकेने अन्य कामांत चांगली सुधारणा केली असल्याचे वैधानिक लेखा परिक्षकांनी अहवालात म्हटले आहे. जिल्हा बँकेत कर्मचाऱ्यांच्या अपहाराच्या घटना गंभीर आहेत. हे प्रकार पूर्ण थांबवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे अहवालात म्हटले आहे.








