423.9 मि. मी. पावसाची नोंद : जोरदार पावसामुळे पेरणी केलेले भातपीक वाया जाण्याचा धोका
खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यात रविवारी रात्रीपासून जोरदार पावसाने झोडपले आहे. सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील शेती पूर्णपणे धोक्यात आली आहे. आतापर्यंत पेरणी केलेली भात शेती पूर्णपणे वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. नट्टीसाठी पेरण्यात आलेले रोपही कुजण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे यावर्षी भातपीक पूर्णपणे जाणार असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. तालुक्यात आतापर्यंत 423.09 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. नोंद झालेल्या पावसात 79 टक्के जादा पाऊस झाला असल्याची नोंद पर्जन्यमापक केंद्रात झाली आहे. जून महिन्यात प्रथमच इतका पाऊस झाल्याची पहिलीच घटना असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. पावसामुळे शेतातून पाणीच पाणी झाले असल्याने खरिपाची पेरणी केलेली पिके वाया जाणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. पेरणी केलेली पिके पावसामुळे न उगवताच कुजून गेली आहेत रोपे सतत पाण्यात राहिल्याने नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणी करण्याचे संकट उभारले आहे. सध्या पावसाने पूर्णपणे उघडीप देणे गरजेचे आहे.
सध्या पावसाने उघडीप देणे गरजेचे
वळिवाचा पाऊस आणि त्यानंतर पाठोपाठ सुरू झालेला मान्सून यामुळे शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरण्याच व्यवस्थित करता आल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नट्टीसाठी भात रोपाची पेरणी केली होती. मात्र जोरदार पावसामुळे भात रोपही व्यवस्थित उगवलेली नाहीत. त्यामुळे यावर्षी भातपीक पूर्णपणे वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे ऊस वाढीवरही परिणाम होणार आहे. रताळी, बटाटे, भुईमूग यासह इतर पिकांचीही लागवड आणि पेरणी करण्यासाठी पावसाने उघडीप देणे गरजेचे आहे.









