बेळगाव : अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनंतर देशभरातील विमानतळांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर बेळगाव विमानतळ प्राधिकरणाकडून जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अहमदाबादसारखी विमान दुर्घटना घडल्यास अग्निशमन विभाग, आपत्ती निवारण विभाग, पोलीस, होमगार्ड, वैद्यकीय सेवा यांनी कोणती भूमिका बजावावी, यासंदर्भातील बैठक पार पडली. बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. देशातील मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, बेंगळूर, दिल्ली, जयपूर यासह इतर शहरांना विमानसेवा दिली जाते.
दररोज हजार ते बाराशे प्रवासी विमानतळावरून ये-जा करतात. त्यामुळे देशातील प्रमुख विमानतळांमध्ये बेळगावचा समावेश होतो. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा हा महत्त्वाचा विषय ठरला आहे. अहमदाबादसारखी विमान दुर्घटना घडल्यास अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. अपघातग्रस्तांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी तात्काळ नियोजन कसे करावे, यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. जिल्हा प्रशासनाकडून अनेक सूचना या बैठकीवेळी करण्यात आल्या. विमानतळ संचालक त्यागराजन यांनी मार्गदर्शन केले. यासंदर्भात लवकरच सर्व विभागांचे मॉक ड्रिल घेण्यासंदर्भातही चर्चा झाली. बैठकीला विमानतळ प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, एसडीआरएफ, अग्निशमन विभाग, बिम्स, केएलई, लेकव्ह्यू, भरतेश हॉस्पिटलचे सदस्य उपस्थित होते.









