कोल्हापूर / इंद्रजित गडकरी :
पुर्वी मतदान ओळखपत्र मिळण्यासाठी तीन महिन्याचा अवघी लागत होता. आता देशभरात मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी लागणारा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार आहे, केवळ 15 दिवसांत निवडणूक ओळखपत्र मिळणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. यासाठी ‘ईसीआयनेट‘ नावाच्या नव्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक खास माहिती तंत्रज्ञान प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या निर्णयाचा थेट फायदा कोल्हापूर जिह्यातील मतदारांनाही होणार आहे, कारण येत्या काही महिन्यांत जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका अपेक्षित आहेत.
- प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक
या नव्या प्रणालीनुसार मतदार नोंदणी अधिक्रायांकडून ओळखपत्र तयार होताच त्याचे डिजिटल ट्रॅकिंग सुरू होईल. मतदाराला प्रत्येक टप्प्यावर एसएमएसद्वारे माहिती मिळेल, जसे की अर्ज स्वीकारला गेला, कार्ड तयार झाले, टपाल विभागाकडे सुपूर्त झाले वगैरे. हे सर्व कार्ड टपाल विभागाच्या एपीआय प्रणालीमार्फत घरपोच पाठवले जाणार आहे, त्यामुळे मतदारांना वेळेत मतदान ओळखपत्र मिळणार आहे.
ही संपूर्ण सुधारित प्रणाली मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, तसेच निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे सेवा वितरणात मोठा बदल घडणार असून, कार्ड तयार होण्यापासून ते घरपोच पोहोचवण्यापर्यंत सर्व टप्प्यांचे रिअल टाइम ट्रॅकिंग आता शक्य होणार आहे.
- स्थानिक निवडणूकीत फायदा
कोल्हापूर जिह्यात देखील येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी मतदार ओळखपत्र असणे अत्यावश्यक आहे. यापूर्वी अनेक नवमतदार किंवा स्थलांतरित नागरिक वेळेत कार्ड मिळत नसल्याने मतदान प्रक्रियेतून वंचित राहत होते. पण आता केवळ 15 दिवसांत ओळखपत्र मिळाल्यामुळे नवीन मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. विशेषत: विद्यार्थी, स्थलांतरित कामगार, आणि नवविवाहित महिलांना याचा मोठा लाभ होणार आहे.
- आयोगाच्या शिफारशींचा आधार
या प्रणालीचा आधार राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या शिफारशींवर आधारित असून, त्याचे केंद्राकडून अंमलबजावणीस आता अधिकृत स्वरूप देण्यात आले आहे. मागील निवडणुकांमध्ये मतदार ओळखपत्रे वेळेत न मिळाल्याच्या अनेक तक्रारी होत्या. नव्या यंत्रणेमुळे हा त्रास संपुष्टात येईल, असा विश्वास व्यक्त केला जातो.
- भविष्यात होणार फायदा
‘ईसीआयनेट‘ प्रणालीला भविष्यात मतदार यादीतील बदल, नाव दुरुस्ती, व क्षेत्रांतर नोंदणी यांसारख्या सेवांसाठीही वापरण्याचा विचार सुरू आहे. एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर मतदारसंबंधी सर्व सेवा उपलब्ध झाल्यास संपूर्ण व्यवस्था आणखी सुगम होईल.
- संपूर्ण प्रक्रिया एका दृष्टीक्षेपात :
-अर्ज दिल्यानंतर 15 दिवसांत ओळखपत्र मिळणार
-प्रत्येक टप्प्यावर एसएमएसद्वारे अपडेट
-कार्ड टपाल विभागाच्या एपीआय द्वारे ट्रॅकिंगसह घरपोच मिळणार आहे.
-कोल्हापूर जिह्यातील स्थानिक निवडणुकांपूर्वी मोठा फायदा
-मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर अधिक्रायांच्या मार्गदर्शनाखाली नव्या प्रणालीची अंमलबजावणी
-लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नवमतदारांना मोठी संधी
- मतदारांचा वेळ वाचण्यास होईल मदत
पूर्वी सर्व तालूक्यांचा मतदार डेटा एकत्र करून मुख्य निवडणूक अधिकारी कार्या लय मुंबई येथे पाठवण्यात येई त्यामूळे सर्व डेटा विश्लेषण करून ते ओळखपत्र तयार करायला खूप वेळ लागे. परंतू निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयामूळे मतदारांचा डेटा डायरेक्ट मुंबईच्या ऑफिसकडे जमा होईल त्यामूळे लवकर कार्यवाही होउढन मतदारांना ओळखपत्र पंधरा दिवसांत मिळेल. भविष्यात मतदारांचा वेळ वाचून जे मतदार मतदानापासून वंचित राहतात त्यांना आता वेळेत ओळखपत्र मिळल्यामूळे येत्या निवडणूकांत मतदान करता येईल.
समाधान शेंडगे, निवडणूक उपजिल्हा अधिकारी, कोल्हापूर.








