आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप : फ्रीस्टाईल प्रकारात मिळविले ऐतिहासिक यश
वृत्तसंस्था/ वुंग ताउ, व्हिएतनाम
भारताच्या पुरुष फ्रीस्टाईल मल्लांनी यू-23 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये आजवरची सर्वोत्तम कामगिरी करताना 6 सुवर्ण व एक पदकासह सांघिक जेतेपद पटकावले. त्याआधी महिला मल्लांनीही शानदार प्रदर्शन करीत चॅम्पियन ट्रॉफी पटकावली.
भारताचे फ्रीस्टाईल प्रकारातील कोणत्याही आशियाई स्पर्धेतील हे आजवरचे सर्वोत्तम प्रदर्शन आहे. निखिलने 61 किलो गटात, सुजीत कलकलने 65 किलो गटात, जयदीपने 74 किलो गटात, चंदर मोहनने 79 किलो गटात सचिनने 92 किलो गटात, विकीने 97 किलो गटात सुवर्ण मिळविले तर जसपूरन सिंगने 125 किलो वजन गटात रौप्यपदक मिळविले. ग्रीको रोमन प्रकारात एका सुवर्णासह एकूण तीन पदके पटकावली. महिला संघाने सर्व दहाही प्रकारात पदक मिळवित चॅम्पियनशिप मिळविली.
भारताच्या फ्रीस्टाईल संघाने पूर्ण वर्चस्व राखत ऐतिहासिक माईलस्टोन नोंदवला. आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये भारतीयांची वर्चस्व वाढत चालले असल्याचेच यातून स्पष्ट दिसून येते. केंद्रीय क्रीडा मंत्रालय, केंद्र सरकार, भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्याकडून मिळणाऱ्या पाठिंब्याचेच हे फलित असल्याचे भारतीय कुस्ती फेडरेशनने म्हटले आहे.









