चीनच्या विश्वासघातानंतर संताप
वृत्तसंस्था/ काबूल
चीनच्या विश्वासघातानंतर तालिबानने मोठे पाऊल उचलत चिनी कंपनीच्या विरोधात कठोर कारवाई केली आहे. तालिबान राजवटीच्या खाण आणि पेट्रोलियम मंत्रालयाने चिनी कंपनी अफचिनसोब अमू नदीतील कच्चे तेल बाहेर काढण्याचा करार रद्द केला आहे. हा करार 25 वर्षांसाठी होता.
चीनच्या कंपनीने करारातील आश्वासनांची पूर्तता केली नाही. याचमुळे हा करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात गुंतवणूक करण्यास अपयश, कच्च्या तेलाच्या विहिरींचे ड्रिलिंग आणि एक्स्प्लोरेशनमध्ये कमी, आवश्यक हमीची पूर्तता न करणे, अफगाण नागरिकांना रोजगार देण्यास अपयश आणि निष्काळजीपणाचा आरोप तालिबानकडून करण्यात आला आहे.
एका संयुक्त आंतर-मंत्रालयीन समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीच्या चौकशीदरम्यान चिनी कंपनीने कराराच्या अटींकडे वारंवार दुर्लक्ष केल्याचे आणि तरतुदींची अंमलबजावणी करण्यास अपयशी ठरल्याचे आढळून आले. आर्थिक उप कार्यालयाची शिफारस आणि तालिबान प्रमुखांच्या आदेशाच्या आधारावर अफचिनसोबतचा अमू नदी खोऱ्यातील कच्चे तेल शोध करार समाप्त करण्यात आल्याचे अफगाणिस्तानच्या खाण आणि पेट्रोलियम मंत्रालयाचे प्रवक्ते हुमायूं अफगाण यांनी सांगितले आहे.
याचदरम्यान अफगाणिस्तानच्या आर्थिकतज्ञांनी देशाच्या तत्काळ गरजा पाहता खाण प्रकल्पांच्या प्रक्रियेत अधिक चौकशीच्या महत्त्वावर जोर दिला आहे. अफगाणिस्तानात स्थानिक भागीदारीयुक्त कंपन्यांना प्रकल्प देण्याची मागणी केली जात आहे. या कंपन्यांना प्रकल्प प्रदान केल्यास भविष्यात अशाप्रकारच्या समस्यांपासून वाचले जाऊ शकते असे बोलले जात आहे.
अफगाणिस्तानला कच्च्या तेलाची मोठी आवश्यकता आहे आणि कुठल्याही प्रकारे मिळविण्याची गरज आहे. विदेशी कंपन्यांनी अफगाणिस्तानात कच्च्या तेलाचे प्रकल्प प्राप्त केले आणि काहीच न केल्यास अफगाणिस्तानला लाभ होणार नाही. तसेच प्रशासनाने आता अशाप्रकारचे प्रकल्प लांबले जाऊ नयेत याची खबरदारी घ्यायला हवी असे आर्थिक विश्लेषकाने म्हटले आहे.









