नारायण सावंत यांच्या तक्रारीची घेतली दखल
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील लेंडी नाल्याची स्वच्छता न झाल्याने शेतीला नुकसान होणार असल्याची तक्रार शेती बचाव समितीच्या माध्यमातून महापालिकेकडे करण्यात आली होती. याची दखल घेऊन शनिवारी स्थायी समिती अध्यक्ष व मनपा अधिकाऱ्यांनी लेंडी नाल्याची पाहणी केली. लेंडी नाल्यावरील अतिक्रमणामुळे काही ठिकाणी पाणी जाण्यास अडचण असल्याचे दिसले.
शेती बचाव समितीचे नारायण सावंत यांनी मागील आठवड्यात महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. शहरात नालेसफाई केल्याने पाणी वेगाने लेंडी नाल्यात जात आहे. परंतु, नाल्यात पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पाणी थेट शेतांमध्ये शिरत आहे. काही ठिकाणी नाल्याची रुंदी चार फूट आहे. त्यामुळे पाणी पुढे सरकत नसल्याचे दिसले. काही ठिकाणी झाडेझुडपे वाढल्याने पाणी अडकत आहे.
मागील 20 वर्षांपासून शेतकऱ्यांकडून मागणी होत असतानाही महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली. सध्या जेसीबी जात नसल्याने सफाई करणे योग्य होणार नाही. डिसेंबरनंतर नाल्याची सफाई करणे योग्य ठरेल, अशी सारवासारव मनपा अधिकाऱ्यांनी केली. परंतु, शेतकऱ्यांनी त्यांना चांगलेच सुनावले. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष जगदीश सौंदत्ती, अभियंता कुरेरसह जिनगौडा पाटील, आनंद चौगुले, मारुती सावंत, रमेश मुतगेकर यांसह इतर उपस्थित होते.









