सात्यकी सावरकर यांचे प्रतिपादन : सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमाला
प्रतिनिधी/ बेळगाव
अंदमानहून परतल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय कार्य केले? असा प्रश्न खोचकपणे विचारला जातो. त्यांचे कार्य पोहोचू न देणे हा सरकारी दोष असू शकतो. जे विचार पटत नाहीत ते समजून न घेण्याची सवय आपल्याला लागली आहे. पण अप्रिय असले तरी काही विषय समजून घेणे आवश्यक असते. अंदमानहून आल्यानंतर सावरकरांनी जात व अस्पृश्यता निर्मूलन, शुद्धीकरण या मोहिमा हाती घेतल्या. समाजाला विज्ञाननिष्ठ बनविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे एका अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकर हे समाज क्रांतिकारक होते, हे कधीही विसरता कामा नये, असे प्रतिपादन सात्यकी सावरकर यांनी केले.
सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमालेमध्ये सावरकरांचे सामाजिक कार्य या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर क्रेडाईचे अध्यक्ष युवराज हुलजी, कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर, उपाध्यक्ष डॉ. दत्तप्रसाद गिजरे व सचिव आर. एम. करडीगुद्दी उपस्थित होते.
सात्यकी सावरकर म्हणाले, अंदमानहून आल्यावर सावरकरांनी याचिका लिहिल्या. रत्नागिरीतील कारागृहात दोन अटी त्यांच्यावर लादण्यात आल्या होत्या. राजकारणात भाग घ्यायचा नाही व रत्नागिरी सोडून जायचे नाही, या अटी त्यांनी मान्य केल्या. येथेच त्यांनी हिंदुत्व हे पुस्तक लिहिले. पळत्या बैठका त्यांनी घेतल्या व कैद्यांना काम करता करता साक्षर केले. त्यामुळे सावरकर आल्यावेळी जी एक टक्का साक्षरता होती, ती सावरकरांमुळे 80 टक्के झाली.
जाती निर्मूलनाचे कार्य सावरकरांनी हाती घेतले. त्यावेळी बंदीवानांना परधर्मात जाण्यासाठी आमिषे दाखविली जात. सावरकरांनी हे प्रयत्न हाणून पाडले व तुळशीपत्र आणि गायत्री मंत्राने पुन्हा त्यांना धर्मात घेतले. अशा पद्धतीने धर्मांतरण रोखले. जातीभेद इतका भिनला होता की लोकांना अस्पृश्य केले जात असे. यासाठी त्यांनी सामाजिक क्रांतीचे कार्य आरंभले. आणि हिंदू समाज ज्या सात श्रृंखलांमध्ये अडकला आहे, त्या म्हणजे स्पर्शबंदी, रोटीबेटी बंदी, समुद्र व व्यवसायबंदी, शुद्धी व सिंधू बंदी यामुळे आपला ऱ्हास झाला आहे. त्यामुळेच आपण आज पारदास्य अनुभवत आहोत, हे सातत्याने ते सांगत राहिले.
आपले धर्मग्रंथ काळाच्या कसोटीवर उतरले पाहिजेत हा त्यांचा आग्रह होता. धर्मग्रंथांकडे इतिहास म्हणून पहा, ते आदरणीय आहेत पण अनुकरणीय नाहीत हे सांगण्याचे धाडस सावरकरांमध्ये होते. गो-पूजन नव्हे तर गो-पालन करा, असा त्यांचा आग्रह होता. रत्नागिरीचे पतीत पावन मंदिर त्यांनी सर्वांना मुक्त केले. इतकेच नव्हे तर जवळ जवळ 400 मंदिरे त्यांनी सर्व जाती-धर्मांसाठी मुक्त केली. आपण दास म्हणजेच पारतंत्र्यात असल्याने पतीत आहोत व स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण पावन होणार आहोत. त्यासाठी त्या विष्णूचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वांनाच मंदिर प्रवेश हवा हा आग्रह त्यांनी धरला.
जन्मजात, जातीभेदाचा उच्छेद व गुणजात जातीभेदाचा उद्धार या सूत्राचा अवलंब करून स्वा. सावरकरांनी सामाजिक कार्य केले. पद्धतशीरपणे या कार्याची माहिती समोर येऊ नये असा प्रयत्न असताना आपण सावरकरप्रेमींनी हे कार्य समजून घेऊन इतरांप्रमाणे पोहोचविले पाहिजे, असेही सात्यकी म्हणाले.
प्रारंभी अक्षता व विनायक मोरे यांनी प्रार्थना व जयोस्तुते हे गीत सादर केले. सांगलीकर व डॉ. गिजरे यांनी वक्त्यांचा व युवराज हुलजी यांचा सत्कार केला. शोभा लोकूर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.









