ट्रॅक्टर चालकाला विचारला जाब : टाकलेला सर्व कचरा उचलण्याची सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
हरिकाका कंपाऊंड ते लेंढी नालापर्यंत राष्ट्रीय महामार्गाशेजारी अज्ञातांकडून कचऱ्याचे ढीग टाकले जात होते. मृत जनावरे, सडलेले खाद्यपदार्थ, तसेच टाकाऊ पदार्थ रस्त्याशेजारी टाकण्यात येत आहेत. शनिवारी कचरा टाकणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकाला अडवून त्याच्यावर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. टाकलेला सर्व कचरा जमा करून न नेल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला.
राष्ट्रीय महामार्गाशेजारी खुल्या जागेत मागील काही दिवसांपासून कचरा फेकला जात आहे. शहरात इतर ठिकाणी कचरा टाकण्यास मनाई असल्याने आता रस्त्याशेजारी शेतीनजीक कचरा टाकला जात असल्याचे दिसून येत होते. दुर्गंधीमुळे ये-जा करणाऱ्या नागरिक, तसेच शेतकऱ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागत होता. सर्व्हिस रस्त्याशेजारी सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. परंतु कचरा कोण टाकतो? याची माहिती मिळत नव्हती.
शनिवारी महानगरपालिकेचे नगरसेवक, तसेच अधिकारी या परिसरात गेले होते. त्यावेळी त्यांना कचरा टाकण्यासाठी आलेला एक ट्रॅक्टर दिसला. सामाजिक कार्यकर्ते नारायण सावंत यांनी ट्रॅक्टर चालकाला जाब विचारला. त्यावेळी त्याने थातूरमातूर उत्तरे देण्यास सुरुवात केली. आपण पहिल्यांदाच येथे कचरा टाकण्यासाठी आल्याचे त्याने सांगितले. परंतु या परिसरात मेलेली जनावरे, चिकन-मटणाचे उरलेले मांस, तसेच इतर कचरा असल्याचे मनपा अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.
कचरा टाकण्यासाठी आलेल्या ट्रॅक्टरला नंबर प्लेटदेखील नव्हती. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ आरोग्य निरीक्षकांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तसेच टाकलेला सर्व कचरा उचलण्याची सूचना करण्यात आली. कचरा वेळेत न उचलल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.









