दोन सामन्यांची कसोटी मालिका, नजमुल हुसेन शांतो ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / गॅले
यजमान श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील येथे शनिवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी पहिली कसोटी अनिर्णीत अवस्थेत संपुष्टात आली. बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेनने या सामन्यातील दोन्ही डावात शतके नोंदवून सामनावीराचा बहुमान पटकाविला. उभय संघात दोन सामन्यांची ही कसोटी मालिका 2025-27 च्या आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत असून या सायकलमधील हा पहिला सामना आहे.
या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी दमदार फलंदाजी केली. बांगलादेशने पहिल्या डावात 495 धावा जमविल्यानंतर लंकेने पहिल्या डावात 485 धावांपर्यंत मजल मारल्यगानंतर बांगलादेशने केवळ 10 धावांची नाममात्र आघाडी मिळविली. बांगलादेशच्या पहिल्या डावात कर्णधार नजमुल हुसेन शांतो आणि मुश्फिकुर रहीम यांनी शानदार शतके झळकविले तर लिटॉन दासने 90 धावांची खेळी केली. लंकेतर्फे असिता फर्नांडोने 4 तर मिलन रत्ननायके आणि टी. रत्ननायके यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. लंकेच्या पहिल्या डावामध्ये सलामीच्या पी.निशांकाने शानदार शतक झळकविताना 187 धावा जमविल्या. दिनेश चंडीमल आणि कमिंदु मेंडीस यांनी अनुक्रमे 54 आणि 87 धावा केल्या. बांगलादेशतर्फे नईम हसनने 5 तर हसन मेहमुदने 3 गडी बाद केले.
बांगलादेशने 3 बाद 177 या धावसंख्येवरुन शनिवारी पाचव्या आणि शेवटच्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ केला. पहिल्या डावात शतक झळकविणाऱ्या कर्णधार नजमुल हुसेन शांतोने 199 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 125 जमविल्या. सलामीच्या सदमान इस्लामने 7 चौकारांसह 76 धावा केल्या. कर्णधार शांतो आणि मुश्फिकुर रहीम यांनी चौथ्या गड्यासाठी 109 धावांची शतकी भागिदारी केली. रहीमने 4 चौकारांसह 49 धावा जमविल्या. खेळाच्या शेवटच्या दिवशी पावसाचा अडथळा आल्याने उपाहारापूर्वी खेळ लवकर थांबवावा लागला. खेळाच्या पहिल्या सत्राअखेर बांगलादेशने 76 षटकात 4 बाद 237 धावा जमविल्या होत्या. खेळाच्या दुसऱ्या सत्रात बांगलादेशने आणखी दोन गडी गमविले. नजमुल शांतोने या सत्रात आपले सलग दुसरे शतक 9 चौकारांसह 190 चेंडूत पूर्ण केले. चहापानावेळी बांगलादेशने 87 षटकाअखेर 6 बाद 285 धावांवर डावाची घोषणा करत लंकेला निर्णायक विजयासाठी शेवटच्या सत्रात 296 धावांचे आव्हान दिले.
ताजुल इस्लामचे 3 बळी
लंकेने चहापानावेळी आपले दोन गडी केवळ 34 धावांत गमविले. सलामीचा उदारा ताजुल इस्लामच्या गोलंदाजीवर दासकरवी यष्टीचित झाला. त्याने 9 धावा केल्या. त्यानंतर नईम हसनने सलामीच्या निशांकाला कर्णधार शांतोकरवी झेलबाद केले. निशांकाने 4 चौकारांसह 24 धावा जमविल्या. ताजुल इस्लामने लंकेला आणखी एक धक्का देताना चंडीमलचा 6 धावांवर त्रिफळा उडविला. अँजेलो मॅथ्युज हा ताजुल इस्लामचा तिसरा बळी ठरला. मॅथ्युजने 1 चौकारासह 8 धावा जमविल्या. लंकेने आपले चार गडी 48 धावांत जमविले. कमिंदु मेंडीस आणि कर्णधार धनंजय डिसिल्वा यांनी सावध फलंदाजी करत शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून कसोटी अनिर्णीत राखली. कमिंदु मेंडीसने 1 चौकारासह नाबाद 12 तर धनंजय डिसिल्वाने 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 12 धावा जमविलया. बांगलादेशतर्फे ताजुल इस्लामने 23 धावांत 3 तर नईम हसनने 29 धावांत 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश प. डाव 495, लंका प. डाव 485, बांगलादेश दु. डाव 87 षटकात 6 बाद 285 डाव घोषित (नजमुल हुसेन शांतो नाबाद 125, मुश्फिकुर रहीम 49, शदमान इस्लाम 73, मोमिनुल हक 14, टी. रत्ननायके 3-102, जयसूर्या आणि मिलन रत्ननायके प्रत्येकी 1 बळी), लंका दु. डाव 32 षटकात 4 बाद 72 (निशांका 24, उदारा 9, चंडीमल 6, मॅथ्युज 8, कमिंदु मेंडीस नाबाद 12, धनंजय डिसिल्वा नाबाद 12, ताजुल इस्लाम 3-23, नईम हसन 1-29)









