बब्बर खालसा इंटरनॅशनल मॉड्यूलचा पर्दाफाश : रिंडा टोळीच्या इशाऱ्यावर शस्त्रास्त्र तस्करीत सहभागी
वृत्तसंस्था/ अमृतसर
पंजाब पोलिसांनी बब्बर खालसा इंटरनॅशनलशी (बीकेआय) संबंधित एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. अमृतसर आयुक्तालय पोलिसांनी स्थानिक पातळीवर हे मॉड्यूल हाताळणाऱ्या ओंकार सिंगला अटक केली आहे.
अमृतसर जिल्हा शहरी पोलिसांनी बब्बर खालसा इंटरनॅशनल दहशतवादी गटाच्या या सदस्याला अटक केली आहे. ओंकार सिंग हा जलाल उस्मा गावचा रहिवासी आहे. पोलिसांनी या आरोपीकडून सहा आधुनिक पिस्तूल आणि मॅगझिन जप्त केल्या आहेत. आरोपी बब्बर खालसा दहशतवादी संघटनेचा सदस्य ब्रिटनमधील धर्मा सिंग उर्फ धरम याच्या संपर्कात होता.
संशयित आरोपी ओंकार सिंग दहशतवादी संघटनेच्या सहकार्याने दहशतवादी कारवाया करत असल्याची माहिती मिळाली होती. आरोपी ब्रिटनमधील दहशतवादी धर्माच्या संपर्कात होता. धर्मा पाकिस्तानात बसून दहशतवादी हरविंदर उर्फ रिंडाशी संपर्क साधत तेथून शस्त्रs आणि ड्रग्ज मिळवत असे. त्यानंतर ओंकार सिंग धर्माच्या सूचनेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा पुरवठा करत असल्याचे दिसून आले आहे. या आरोपीसंबंधीची माहिती मिळताच एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले. त्यानंतर नाकाबंदी करून आरोपीला अटक करण्यात आली. तपासादरम्यान ओंकार सिंग सध्या शिक्षण घेत असून तो 18 वर्षांचा असल्याचे आढळून आले. गेल्या काही दिवसात आरोपी दहशतवाद्यांच्या संपर्कात आला आणि त्यांच्यासोबत दहशतवादी कारवाया करू लागला. सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे. लवकरच या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची अपेक्षा तपास यंत्रणांना आहे.









