सातारा :
राज्याच्या पर्यटनमंत्री असणाऱ्या शंभूराज देसाई यांच्या जिल्ह्यातच पर्यटनावर बंदी घालण्यात आली, असा मेसेज शुक्रवारी सकाळपासून फिरत असल्यामुळे पर्यटकांसह जिल्हावासीयांनीही नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, याबाबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात पर्यटनावर कोणत्याही प्रकारची बंदी घालण्यात आली नसून फक्त प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. सातारा जिल्हा निसर्गसौंदर्याने संपन्न जिल्हा असल्याने जिह्यात पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जिह्यातील पर्यटनस्थळाचा येणाऱ्या पर्यटकांना आनंद घेता यावा यासाठी तेथे कोणत्याही स्वरूपाची बंदी नाही, तथापि सुरक्षिततेच्यादृष्टीने प्रशासनाकडून आचारसंहिता घालून देण्यात आली आहे. पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेत असतानाच अपघात होणार नाही; पर्यटन जीवावर बेतणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
सातारा जिह्यात प्रत्येक ऋतुत पर्यटकांना साद घालणारा जिल्हा आहे. अजिंक्यतारा किल्ला, ठोसेघर धबधबा, केळवली-सांडवली धबधबा, वजराई धबधबा, कास पुष्प पठार, एकीव धबधबा, कास तलाव, बामणोली, पंचकुंड धबधबा, सडावाघापूर उलटा धबधबा, ऊरुल घाट शिव मंदिर धबधबा, रुद्रेश्वर देवालय धबधबा, ओझर्डे धबधबा, घाटमाथा धबधबा, लिंगमळा धबधबा तसेच महाबळेश्वर व पाचगणी पर्यटन स्थळ, व धरणे अशा पर्यटन स्थळांच्या परिसरात राज्यभरातून येण्राया पर्यटकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असते. त्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन दक्षता घेत आहे. पर्यटकांनी त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
पावसाळ्यातील पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता मार्गदर्शक सूचना करताना प्रशासनाने पुढील बाबींवर निर्बंध घातले आहेत. यामध्ये पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे व पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रिकरण करणे, पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्यांचे परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे, वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहन अतिवेगाने अथवा वाहतुकीस अडथळा होईल असे वेगाने चालविण्यास निर्बंध आहेत.
तसेच वाहनांची धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्य पदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे. सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य अश्लिल हावभाव करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवून ध्वनी प्रदूषण करणे, ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू व जल प्रदूषण होईल असे कोणतीही कृती करणे, धबधबे, धरणे व नदी आदी परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करणे (अत्यावश्यक सेवेतील वाहन वगळून) आदी निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध 20 जूनपासून 19 ऑगस्टपर्यंटत लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले आहे. तसेच याचे पालन न झाल्यास कायदेशीर कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.








