तहसीलदार किरण जमदाडे यांच्या संकल्पनेला प्रतिसाद
By : अभिजीत जवळकोटे
मंद्रूप : दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्या संवेदनशीलतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. तहसील कार्यालयात विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून एक लोकोपयोगी उपक्रम राबवला आहे.
उन्हाळ्यात कार्यालयात येणाऱ्या जनतेसाठी तहसीलदार जमदाडे यांनी मंडपाची सोय केली होती. आता पावसाळ्यात नागरिकांना पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी कार्यालयाच्या समोरील मोकळ्या जागेत चक्क पत्र्याचे मजबूत व कायमस्वरूपी निवारा शेड उभारण्यात आले आहे. हा निवारा शेड पूर्णपणे कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी वर्गणी गोळा करून दोन दिवसांत उभा केला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अचानक आलेल्या पावसाचे निमित्त
यावर्षी अवकाळी पाऊस आणि वेळेआधी दाखल झालेल्या मान्सूनमुळे चांगल्या पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. तहसील कार्यालयात शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. अचानक पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडत असल्याचे लक्षात घेत तहसीलदार किरण जमदाडे यांनी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी निवारा शेड उभारण्याची कल्पना मांडली.
या कल्पनेला कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी भरभरून पाठिंबा दिला. तहसील कार्यालयातील कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी आपापल्या पदरातून वर्गणी गोळा केली. या निधीतून चांगल्या दर्जाचे पत्रे आणि लोखंडी अँगलच्या साहाय्याने कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना मजबूत निवारा शेड उभारण्यात आले.
कार्यालयात आधीपासूनच सुविधा
महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यातील उपक्रमांतर्गत तहसील कार्यालयात यापूर्वीच अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अभ्यागत कक्षात गालिचा, आरामदायी बैठक व्यवस्था, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, पिण्याच्या पाण्याची सुविधा, मोबाईल चार्जिंग पॉईंट, वाचनासाठी दैनंदिन वृत्तपत्रे व मासिके, तसेच परिसरात सकारात्मक ऊर्जा देणारी रोपे यामुळे कार्यालय आकर्षक व लोकाभिमुख बनले आहे.
लोकांचे हाल पहावले नाही…
या संदर्भात तहसीलदार किरण जमदाडे म्हणाले, “मी एकदा कामासाठी कार्यालयातून बाहेर जात असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्या वेळी विविध कामांसाठी आलेले शेतकरी, महिला, नागरिक पावसापासून बचाव करण्यासाठी धावत कार्यालयात आले. ते भिजलेले होते. हे दृश्य पाहून नागरिकांच्या सोयीसाठी कायमस्वरूपी मजबूत निवारा शेड उभारण्याचा निर्णय घेतला. जनतेची, शेतकरी बांधवांची सेवा माझ्या हातून घडावी यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीन.”
नागरिकांकडून समाधान
व्यक्तहा निवारा शेड उभारल्यामुळे आता तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना अचानक पावसाने त्रास होणार नाही. शेतकरी व नागरिकांनी तहसीलदार जमदाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, तहसील कार्यालयाचा हा लोकोपयोगी उपक्रम तालुक्यात कौतुकाचा विषय ठरला आहे.








