प्रतिनिधी/ बेळगाव
वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून शहरातील अतिक्रमण हटविण्याचे काम सुरूच आहे. शुक्रवारी रविवारपेठ, टेंगीनकेरा गल्ली, मेणसी गल्ली, कांदा मार्केट आदी ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम भरपावसात देखील राबविण्यात आली. तर गुरुवारी खडेबाजार, पांगूळ गल्ली, भेंडीबाजार, गणपत गल्ली, समादेवी गल्ली, मारुती गल्ली आदी ठिकाणी रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण हटवून ते ताब्यात घेण्यात आले होते.
गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त जोतिबा निकम यांनी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या माध्यमातून दररोज अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे. मात्र तरीदेखील ‘पुढचे पाठ मागचे सपाट’ या उक्तीप्रमाणे बैठे विक्रेते, फेरीवाले व व्यापारी पुन्हा अतिक्रमण करत आहेत. मध्यंतरी अतिक्रमण हटाव मोहिमेला जोरदार विरोध झाला होता.
मात्र रस्त्याच्या कडेला मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्याच्या बाहेर कोणीही थांबून व्यवसाय करू नये, पांढऱ्या पट्ट्याच्या आत थांबूनच व्यवसाय करावेत, दुकानदारांनी देखील दुकानाबाहेर झंप मारू नयेत, अशी सूचना केली जात आहे. पोलीस व मनपा कर्मचारी कारवाईसाठी आल्यानंतर तात्पुरता अतिक्रमण हटविले जात आहे. मोहीम पुढे गेल्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण होत आहे.









