वृत्तसंस्था / जोहान्सबर्ग
आयसीसीची विश्वचषक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा पहिल्यांदाच जिंकणाऱ्या द. आफ्रिका संघाचा नियमीत कर्णधार टेंबा बवूमाला दुखापतीमुळे आगामी होणाऱ्या झिम्बाब्वे विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागणार आहे. त्याच्या जागी केशव महाराजकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे.
आयसीसीच्या विश्वचषक चॅम्पियनशिप कसोटी स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाबरोबर झालेल्या अंतिम सामन्यात खेळाच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना बवूमाच्या डाव्या हाताच्या स्नायुला दुखापत झाली होती. ही दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झाली नसल्याने त्याने या आगामी मालिकेत न खेळण्याचा निर्णय क्रिकेट द. आफ्रिकेला कळविला आहे. आता झिम्बाब्वे विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी द. आफ्रिकेचा हंगामी कर्णधार म्हणून केशव महाराजची नियुक्ती केली आहे. झिम्बाब्वे आणि द. आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी 28 जून पासून खेळविली जाईल. 2025-27 च्या आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप सायकल अंतर्गत द. आफ्रिकेचा हा पहिला सामना आहे.









