इंग्रजी ही लाज नाही तर शक्ती असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषेसंबंधीच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. इंग्रजी ही लाज नाही तर शक्तीपूर्ण भाषा असल्याचा दावा करत त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांना टार्गेट केले. भारतातील गरीब मुलांनी इंग्रजी शिकावे, पुढे जावे असे भाजप आणि आरएसएस मुळीच वाटत नाही. सद्यस्थितीत आपण प्रत्येक मुलाला इंग्रजी शिकवले पाहिजे कारण आजच्या युगात इंग्रजी भाषा ही मातृभाषा हिंदीइतकीच महत्त्वाची असल्याचेही ते पुढे म्हणाले.
गृहमंत्री अमित शाह यांच्या कथित विधानानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ही टिप्पणी केली आहे. राहुल गांधींनी ‘एक्स’वर ‘इंग्रजी धरण नाही तर पूल आहे. इंग्रजी लाज नाही तर शक्ती आहे’, असे म्हटले आहे. आजच्या जगात इंग्रजी ही तुमच्या मातृभाषेइतकीच महत्त्वाची आहे, कारण ती रोजगार देईल आणि आत्मविश्वास वाढवेल. भारतातील प्रत्येक भाषेत आत्मा, संस्कृती आणि ज्ञान आहे. आपण त्यांची कदर केली पाहिजे आणि त्याच वेळी प्रत्येक मुलाला इंग्रजी शिकवले पाहिजे. जगाशी स्पर्धा करणाऱ्या भारताचा हा मार्ग आहे. प्रत्येक मुलाला समान संधी द्या, असेही ते पुढे म्हणाले.









